फायनलमध्ये 2 धावांवर बाद झाल्यानं शेफालीला आणखी एक धक्का

फायनलमध्ये 2 धावांवर बाद झाल्यानं शेफालीला आणखी एक धक्का

महिलांच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात भारताच्या शेफाली वर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त दोनच धावा करता आल्या.

  • Share this:

मुंबई, 09 मार्च : भारताची 16 वर्षीय महिला क्रिकेटपटू शेफाली वर्माला टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात फक्त दोनच धावा काढता आल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत आधीच्या सामन्यांत जबरदस्त खेळी साकारणाऱ्या शेफालीला शेवटच्या सामन्यातील या खेळीने मोठा फटका बसला आहे. आयसीसी रँकिंगमध्ये तिची दोन स्थानांनी घसरण झाली. वर्ल्ड कप दरम्यान आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत शेफालीने पहिलं स्थान पटकावलं होतं. मात्र अखेरच्या सामन्यात तिला 2 धावा काढता आल्या. याचा परिणाम तिच्या आयसीसी रँकिंगवर झाला.

आता शेफालीची दोन स्थानांनी घसरण झाली असून ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीने बाजी मारली आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारून देणाऱ्या बेथने 762 गुणांसह पहिलं स्थान पटकावलं आहे. तर सुझी बेट्स दुसऱ्या स्थानी आहे. शेफाली तिसऱ्या स्थानावर घसरली असून तिचे 744 गुण आहेत. भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधनालासुद्धा फटका बसला आहे. तिची एका स्थानाने घसरण झाली आहे. स्मृती 694 गुणांसह सातव्या तर जेमिमाह रॉड्रिग्ज 643 गुणांसह नवव्या स्थानी आहे.

वर्ल्ड कपमध्ये शेफालीने 5 सामन्यात मिळून 163 धावा केल्या. पहिल्या चार सामन्यात भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱी शेफाली अंतिम सामन्यात लवकर बाद झाली. त्यानंतर भारताची फलंदाजी कोलमडली आणि ऑस्ट्रेलियानं 85 धावांनी विजय साजरा करत पाचव्यांदा जगज्जेतेपद पटकावलं.

याआधी जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये शेफालीने दिग्गज महिला क्रिकेटपटूंना मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं होतं. तेव्हा शेफालीने 761 गुणांसह वर्ल्ड टी20 रँकिंगमध्ये 19 स्थानांनी झेप घेतली होती. तिनं न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकलं होतं.

हे वाचा : ऑस्ट्रेलियाला मिळाली 'छोटी' सचिन, 6 वर्षांच्या मुलीला पाहून घाबरला ब्रेट ली

टी 20 वर्ल्ड कपमध्ये लंकेविरुद्ध शेफालीनं 47 धावांची सर्वोत्तम खेळी केली. सलग दुसऱ्यांदा तिचं अर्धशतक हुकले होते. याआधी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही तिनं 46 धावा केल्या होत्या. वयाच्या 15 व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळालेल्या शेफालीची फटकेबाजी पाहून दिग्गज क्रिकेटपटूंनीही कौतुक केलं होतं.

हे वाचा : क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भिडणार भारत-पाक, ‘या’ दिवशी होणार महामुकाबला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Mar 9, 2020 03:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading