मॅंचेस्टर, 17 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघानं पाकिस्तानला 89 धावांनी नमवले. आतापर्यंत सात वेळा भारतीय संघानं पाकिस्तानला पाणी पाजले आहे. यापूर्वी भारतानं पाकिस्तानला 1992च्या वर्ल्ड कपमध्ये 43 धावांनी, 1996 साली 39 धावांनी, 1999 मध्ये 47 धावांनी, 2003 मध्ये 6 विकेट्सने, 2011मध्ये 29 धावांनी आणइ 2015 मध्ये 76 धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मानं केलेली शतकी खेळी महत्त्वाची ठरली. रोहितच्या या खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानला 337 धावांचे आव्हान दिले. पाकिस्ताननं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला मात्र तो निर्णय त्यांना महागात पडला. कारण भारताने प्रथम फलंदाजी करताना हिटमॅन रोहित शर्माच्या वेगवान शतकी खेळीच्या जोरावर 336 धावा केल्या. भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर असल्यानं त्याच्या जागी खेळणाऱ्या केएल राहुलनं सलामीला येऊन अर्धशतकी खेळी केली. त्याने रोहित शर्मासोबत अर्धशतकी भागिदारी करून दमदार सुरुवात करून दिली. केएल राहुल 57 धावांवर बाद झाला. त्याने रोहित शर्मासोबत 136 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित शर्माने शतक साजरं केलं. रोहित शर्माने 113 चेंडूत 140 धावा केल्या. यात त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले. भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांना कुलदीप यादवनं आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. यामुळं भारताचा विजय पक्का झाला. मात्र, पावसामुळं डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारतानं 89 धावांनी हा सामना जिंकला विजय मिळवला. या सामन्यात रोहितनं 140 धावांची खेळी करत मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला. या सामन्यानंतर पत्रकार परिषदेसाठी आलेल्या रोहितला पाकिस्तान संघाला काय सल्ला देशील असा प्रश्न विचारला असता, यावर रोहितनं ’’ पाकिस्तानचा मी प्रशिक्षक बनेन तेव्हा मी त्यांच्या फलंदाजांना सल्ला देईन, आता नाही.’’ असे मिश्किल उत्तर दिले. तसेच त्याने, “मुलीमुळं मी आणखी सकारात्मक झालो आहे”, असेही तो म्हणाला.
भारतानं पाकिस्तानला हरवत आपला तिसरा विजय नोंदवला. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत 7 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटसेनेनं याआधी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. तर, न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला. आता भारत शनिवारी अफगाणिस्तान विरोधात भिडणार आहे. अफगाणिस्ताननं आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळं भारतासाठी हे आव्हान जड जाणार नाही. वाचा- इंग्लंडचा खेळाडू विराटला म्हणाला, ‘तुझ्यामुळे डिलीट करावं लागेल ट्विटर अकाउंट’ वाचा- विराट कोहलीची चिंता वाढली, धवननंतर आता आणखी एक खेळाडू जखमी वाचा- World Cup : INDvsPAK : सामना संपण्याआधीच आफ्रिदीने भारताचं केलं अभिनंदन! VIDEO: रोहितच्या त्या शतकी खेळीवर प्रशिक्षक झाले फिदा