रांची, 28 जानेवारी : एकदिवसीय मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागलेल्या न्यूझीलंडला अखेर पहिल्या टी20 सामन्यात भारताविरुद्ध विजय मिळवता आला. न्यूझीलंडने भारताला 21 धावांनी पराभूत केलं. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 20 षटकात 155 धावाच करता आल्या. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 19 षटकात 149 धावा केल्या होत्या. मात्र अखेरच्या अर्शदीपने टाकलेल्या षटकात सामन्याचं चित्रच बदललं. अर्शदीपच्या या एका षटकात डेरिल मिशेलने 3 षटकार आणि 1 चौकारासह 27 धावा वसूल केल्या. यामुळे न्यूझीलंडची धावसंख्या 176 वर पोहचली. याच 27 धावा भारताला शेवटी महागात पडल्या.
न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर बोलताना हार्दिक पांड्याने म्हटलं की, कुणीच विचार केला नव्हता की खेळपट्टी अशी असेल. दोन्ही संघांना यामुळे आश्चर्याचा धक्का बसला. पण न्यूझीलंडने चांगला खेळ केला. जुन्या चेंडूपेक्षा नवा चेंडू जास्त वळत होता. मी आणि सूर्यकुमार फलंदाजी करत होतो तोपर्यंत विजयाच्या आशा होत्या. मला नव्हतं वाटलं की ही खेळपट्टी 177 धावांची असेल. आम्ही गोलंदाजी करताना २५ धावा जास्त दिल्या. आम्ही या पराभवातून शिकू.
हेही वाचा : अर्शदीपची शेवटची ओव्हर अन् आघाडीच्या फलंदाजांची हाराकिरी, भारताच्या पराभवाला ठरले कारण
सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. त्याने 4 षटकात 22 धावा देत 2 गडी बाद केले. तर नंतर 28 चेंडूत 50 धावा केल्या. सुंदरचं कौतुक करताना हार्दिक पांड्या म्हणाला की, ज्या पद्धतीने वॉशिंग्टनने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केलं त्यावरून असं वाटत होतं की सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड नव्हे तर वॉशिंग्टन विरुद्ध न्यूझीलंड असा आहे. आम्हाला अशा खेळाडूंची गरज होती जो गोलंदाजी आणि फलंदाजी करू शकेल. आम्हाला यामुळे आत्मविश्वास मिळतो. जर सुंदर आणि अक्षर असेच पुढे खेळत राहिले तर यामुळे भारतीय क्रिकेटला मोठी मदत होईल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन टी20 सामने होणार आहेत. यातील पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये 29 जानेवारी रोजी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket