मुंबई, 03 मार्च : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने दुखापतीनंतर धमाकेदार पुनरागमन केलं आहे. सध्या डीवाय पाटील टी20 स्पर्धेत खेळताना त्यानं वादली खेळी केली आहे. मंगळवारी सीएजीविरुद्ध फक्त 37 चेंडूत शतक साजरं केलं. या शतकी खेळीत पांड्याने 10 षटकार खेचले. रिलायन्स वन संघाकडून खेळताना हार्दिक पांड्याने 39 चेंडूत 105 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 269.23 इतका होता.
रिलायन्स वन टीमकडून खेळताना पांड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत पांड्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडला. पांड्याने 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पुढच्या फक्त 12 चेंडूत शतकाचा टप्पा पार केला. त्या 12 चेंडूत हार्दिक पांड्याने 51 धावा केल्या. पांड्याने त्याच्या खेळीत 10 षटकार आणि 8 चौकार लगावले.
पांड्याने शेवटच्या षटकांत गोलंदाजांवर हल्ला चढवला. अर्धशतक झाल्यानंतर पुढच्या 12 चेंडूत पांड्याने जवळपास प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर टोलावला. पांड्याने 15 व्या षटकात 3 षटकार आणि 2 चौकार मारले. त्यानंतर 17 व्या षटकातही 3 षटकार आणि 1 चौकार मारला. त्याने शतकही षटकाराच्या सहाय्यानं साजरं केलं.
हे वाचा : हार्दिक पांड्याकडून खूपच मोठी चूक, पुन्हा BCCI करणार कारवाई?
याआधीच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर रिलायन्स वनने बँक ऑफ बडोदाविरुद्ध 150 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी करायला उतरलेल्या बँक ऑफ बडोदाच्या संघाला 125 धावांपर्यंत मजल मारता आली. रिलायन्सने सामना 25 धावांनी जिंकला होता. पांड्याने गोलंदाजी करताना 3 गडीही बाद केले.
पांड्याने भारताकडून अखेरचा सामना सप्टेंबर महिन्यात खेळला होता. पांड्याला त्यावेळी टी20 सामन्यात दुखापत झाली होती. टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने पांड्याला उपचारासाठी लंडनला पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यात पांड्या खेळेल असं म्हटलं जात होतं. पण त्याला संधी मिळाली नाही.
हे वाचा : नमो रमो ट्रॉफी : क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रात पण मराठी भाषिकांनाच नो एन्ट्री