दुबई, 12 सप्टेंबर**:** दुबईच्या मैदानात काल श्रीलंकेनं कमाल केली. पाकिस्तानचा 23 धावांनी धुव्वा उडवून यंदाच्या आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. स्पर्धेच्या सुरुवातीला श्रीलंकेचा संघ विजेतेपद पटकावणार असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण दसून शनाकाच्या या युवा संघानं अनेक क्रिकेट पंडितांचा अंदाज चुकवला आणि अभूतपूर्व यशाला गवसणी घातली. श्रीलंकेच्या या विजयानंतर टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनं अनोखी कृती केली. गंभीरच्या हातात श्रीलंकन ध्वज पाकिस्तान-श्रीलंका सामन्यासाठी समालोचक म्हणून गंभीर मैदानात हजर होता. जेव्हा श्रीलंकेनं विजय मिळवला तेव्हा गंभीरनं लंकन ध्वज हातात घेतला. त्यानं आपल्या ट्विटरवरुनही हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याखाली त्यानं ‘सुपरस्टार टीम…. अभिनंदन श्रीलंका!’ असं कॅप्शनही दिलंय. या पोस्टवर अनेक जणांनी कमेंटही केली आहे.
Superstar team…Truly deserving!! #CongratsSriLanka pic.twitter.com/mVshOmhzhe
— Gautam Gambhir (@GautamGambhir) September 11, 2022
गंभीर दोन विश्वविजेत्या भारतीय संघाचा नायक 2007 आणि 2011 च्या विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताच्या विजयात गौतम गंभीरनं मोठं योगदान दिलं होतं. 2007 च्या टी20 वर्ल्ड कपमधली 75 धावांची इनिंग आणि 2011 च्या वर्ल्ड कपमधली 97 धावांची त्याची इनिंग खास होती. गंभीर आगामी लीजंड्स क्रिकेट सामन्यातही भारतीय संघातून खेळताना दिसणार आहे. श्रीलंकेला मिळाली नवी उमेद गेले काही महिने देशातल्या राजकीय अस्थिरतेमुळे डळमळीत झालेल्या श्रीलंकेला नवी उमेद मिळाली आहे. श्रीलंकेत पुढचे काही दिवस जोरदार सेलिब्रेशन होईल कारण दसून शनाकाच्या लंकन संघानं दुबईच्या मैदानात मोठा पराक्रम गाजवला आहे. आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेनं पाकिस्तानचा 23 धावांनी धुव्वा उडवला आणि आशिया चषकावर तब्बल आठ वर्षांनी आपलं नाव कोरलं. त्याचबरोबर श्रीलंकेनं आशिया चषक जिंकण्याची ही आजवरची सहावी वेळ ठरली. सांघिक कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्या टी20 रॅन्किंगमध्ये आठव्या नंबरवर असलेल्या श्रीलंकेनं नंबर दोनवर असलेल्या पाकिस्तानला धूळ चारली.