नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : मेलबर्नच्या मैदानात टीम इंडियानं ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. वर्ल्ड कपच्या मैदानात टीम इंडियानं पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवण्याचा पराक्रम गाजवला. भारताच्या या विजयाचा हीरो ठरला तो विराट कोहली. विराटनं नाबाद 82 धावांची खेळी केली. त्याने या खेळीला आपल्या टी 20 करिअरमधी सर्वोत्तम खेळी आहे, असे म्हटले. ज्याप्रकारे कालचा सामना झाला, पुढची अनेक वर्षे तो चाहत्यांच्या लक्षात राहील. मात्र, यातच आता आणखी एक घटना समोर आली आहे.
4 बाद 31 अशा अडचणीच्या परिस्थितीतून विराटनं टीम इंडियाला बाहेर काढलं. ज्यावेळी अश्विननं विजयी फटका खेळला तेव्हा टीम इंडियाच्या डग आऊटमधून सगळे खेळाडू धावत मैदानात पोहोचले आणि त्यांनी विराटला आलिंगन दिलं. क्रिकेटच्या मैदानातले ते खास क्षण होते. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं तर विराटला चक्क उचलून घेतलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या चित्तथरारक विजयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीनेही ट्वीटर करुन ‘किंग कोहली परतला’ अशी पोस्ट केली आहे. त्यातच आता भारताच्या विजयानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू आणि लोकसभा खासदार गौतम गंभीर यांच्यावर टीका होत आहे. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने या सामन्यानंतर एक ट्विट केले.
हेही वाचा - IND vs PAK : भारत-पाकिस्तान मॅचचा तणाव, 1 लाख प्रेक्षक, हार्दिक एकच शब्द बोलला अन् विराटने इतिहास घडवला
एकीकडे भारताच्या विजयानंतर सर्वत्र कोहलीचे कौतुक होत असताना गौतम गंभीरने जे ट्विट केले त्यात त्याने विराट कोहलीचा उल्लेख टाळला. “विश्वचषक स्पर्धेला सुरुवात करण्यासाठी याहून अधिक चांगला मार्ग नाही. उत्तम कामगिरी केली आहे भारतीय संघाने,” असे ट्विट गंभीरने केले. मात्र, याट्विटमध्ये त्याने विराटचा उल्लेख टाळल्यावर त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानवर रोमांचक विजय मिळवला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रनच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग टीम इंडियाने शेवटच्या बॉलवर केला. विराट कोहली हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. विराटने 53 बॉलमध्ये नाबाद 82 रन केले, यात 4 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.