मुंबई, 18 सप्टेंबर**:** हरमनप्रीत कौरचा भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातल्या टी20 मालिकेनंतर आजपासून उभय संघातली वन डे मालिका सुरु झाली. ही मालिका भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरची मालिका आहे. झुलननं गेली दोन दशकं भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. पण आज जेव्हा इंग्लंडच्या होवमधील काऊंटी ग्राऊंडवरच्या वन डेत झुलन खेळण्यासाठी उतरली तेव्हा तिनं एक गोष्ट नक्की मिस केली असेल. झुलन-मिताली जोडी फुटली झुलन गोस्वामी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेणारी मिताली राज यांच्याशिवाय भारतीय महिला क्रिकेट अधुरं आहे. 2002 पासून या दोघींनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. पण आज जेव्हा झुलन आपली अखेरची वन डे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरली तेव्हा पहिल्यांदाच तिच्यासोबत मिताली राज खेळत नव्हती. मिताली संघात नसताना झुलन खेळत असलेली ही गेल्या 20 वर्षाती पहिलीच वन डे मॅच होती. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्याआधी झुलन गोस्वामीनं 201 वन डे खेळल्या आहेत. त्या प्रत्येक वन डेत मिताली राज संघात होती. या दोघींनी अनेक सामन्यात भारताला यश मिळवून दिलंय. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम मितालीच्या नावावर आहे. तर सर्वाधिक विकेट घेण्याचा मान झुलन गोस्वामीकडे आहे. त्यामुळे या मालिकेनंतर भारतीय महिला क्रिकेटमधल्या यशस्वी जोडीपैकी झुलन गोस्वामीही क्रिकेटला गुडबाय करणार आहे. हेही वाचा - Ind vs Aus: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; नेट्समध्ये ‘या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजाची तुफान फटकेबाजी, पाहा Video
लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा सामना
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन दशकं गाजवल्यानंतर 39 वर्षांच्या झुलननं थांबण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडविरुद्धची आगामी लॉर्ड्स वन डे झुलनच्या कारकीर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. झुलननं आजवर 12 कसोटी, 201 वन डे आणि 68 टी20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तिच्या खात्यात 352 आंतरराष्ट्रीय विकेट्स जमा आहेत.