मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /नव्या कोरोना स्ट्रेनची भीती; तब्बल 47 खेळाडूंना सक्तीने क्वारंटाइन, खोलीतून बाहेर निघण्यासही मज्जाव

नव्या कोरोना स्ट्रेनची भीती; तब्बल 47 खेळाडूंना सक्तीने क्वारंटाइन, खोलीतून बाहेर निघण्यासही मज्जाव

स्पर्धेशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीला नव्या कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर खेळाडूंना हॉटेल क्वारंटाइन (Quarantine) करण्यात आलं.

स्पर्धेशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीला नव्या कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर खेळाडूंना हॉटेल क्वारंटाइन (Quarantine) करण्यात आलं.

स्पर्धेशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीला नव्या कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर खेळाडूंना हॉटेल क्वारंटाइन (Quarantine) करण्यात आलं.

मेलबर्न, 16 जानेवारी : फेब्रुवारी महिन्यात होणार असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेसाठी (Australian Open Tennis Tournament) मेलबर्न येथे आलेल्या 47 खेळाडूंना सक्तीने दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांना घेऊन येणाऱ्या दोन चार्टर्ड विमानांमध्ये तीन कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडल्याने स्पर्धेच्या आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे. या वर्षातली ही पहिलीच ग्रँड स्लॅम (First Grand Slam) स्पर्धा असून आठ फेब्रुवारीपासून ती सुरू होणार आहे.

लॉस एंजलेसवरून आलेल्या विमानातील क्रू मेंबर आणि खेळाडू नसलेल्या, पण स्पर्धेशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीला नव्या कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर 24 खेळाडूंना हॉटेल क्वारंटाइन (Quarantine) करण्यात आलं. त्यानंतर अबूधाबीवरून आलेल्या विमानातील खेळाडू नसलेला एक प्रवासीही पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्या विमानातील 23 जणांनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आलेल्या तिघांनाही आरोग्याची देखरेख पाहणाऱ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं. 14 दिवस होईपर्यंत आणि त्यांची वैद्यकीय तपासणी होईपर्यंत खेळाडूंना त्यांच्या खोल्या सोडता येणार नाहीत, असं आयोजकांनी सांगितलं आहे. तसंच, ते प्रॅक्टिसही करू शकणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा-कोरोनाचा फटका IPL लादेखील बसला, 13 मोसमात पहिल्यांदाच...

या निर्णयामुळे खेळाडूंना सरावामध्ये फरक पडणार आहे. उरुग्वेच्या पाब्लो क्वेवास (Pablo Cuevas) या खेळाडूने (जागतिक क्रमांक 68) आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या. 'पाच तासांचं प्रशिक्षण ते आता 15 दिवसांचं कडक क्वारंटाइन. मी माझे खोलीतल्या खोलीत केलेले वर्कआउट्स तुम्हाला इन्स्टाग्रामवर दाखवीन,' असं ट्विट त्यानं केलं आहे.

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी देशात सुमारे 1200 खेळाडू, अधिकारी आणि अन्य कर्मचारी यांना घेऊन येणाऱ्या 15 विमानांना प्रवेश देण्याचं ऑस्ट्रेलियाने ठरवलं आहे. क्वेवासव्यतिरिक्त मेक्सिकोचा खेळाडू सँतियागो गोन्झालेझ (Santiago Gonzalenz) हादेखील त्या विमानात होता, असं त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलं आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, टेन्नीज सँडग्रेन हा खेळाडूही त्या विमानात होता. त्याला काही कालावधीपूर्वी नव्या कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात त्याला लॉस एंजलीसवरून ऑस्ट्रेलियात येण्याची विशेष परवानगी देण्यात आली होती. त्याव्यतिरिक्त बेलारूसची दुहेरीतील खेळाडू व्हिक्टोरिया अझारेन्कादेखील त्यात आहे.

स्पर्धेचे संचालक क्रेग टायली यांनी सांगितलं, की आम्ही विमानात असलेल्या प्रत्येकाशी संपर्क साधत आहोत. खासकरून खेळाडूंशी संवाद साधला जात आहे, जेणेकरून त्यांना आवश्यक त्या आणि शक्य त्या सोयी-सुविधा गरजेनुसार उपलब्ध करून देता येतील. स्कॉटलंडचा पूर्वीचा नंबर वन खेळाडू अँडी मरेने (Andy Murray) आपण कोविड पॉझिटिव्ह असल्याचं गेल्याच आठवड्यात सांगितलं होतं; मात्र आपली तब्येत बरी असूनही स्पर्धेत खेळण्याची आशा अजूनही सोडली नसल्याचं तो म्हणाला. अमेरिकेची मॅडिसन कीज पॉझिटिव्ह आल्यावर गेल्याच आठवड्यात तिने स्पर्धेतून माघार घेतली. उत्तरेकडच्या क्वीन्सलँड (Queensland) राज्यामधील संसर्ग आटोक्यात येत असल्याने प्रवासावरील निर्बंध उठवण्यास ऑस्ट्रेलियाने हळूहळू सुरुवात केली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Sports