मुंबई, 12 जुलै : लंडनमध्ये रविवारी रात्री झालेल्या युरो कप फायनलमध्ये (Euro Cup 2020 Final) इटलीनं यजमान इंग्लंडचा पराभव करत (Italy vs England) विजेतेपद पटकावले. युरोपातील या सर्वात प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेत दोन्ही टीमनं जोरदार खेळ केला. सामना सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला इंग्लंडच्या ल्यूक शॉ यानं गोल झळकावत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. यूरो फायनलमधील हा सर्वात जलद गोल ठरला. इटलीनं सुरुवातीच्या पिछाडीनंतर जोरदार खेळ केला. इटलीकडून लिओनार्डो बोनच्चीने 67 व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. निर्धारित वेळेसह अतिरिक्त वेळेनंतरही हा सामना 1-1 ने बरोबरीत होता. त्यामुळे अखेर पेनल्टी शूटआउटमध्ये या सामन्याचा निकाल लागला यामध्ये इटलीनं 3-2 अशी बाजी मारली. (Italy Win Euro 3-2 on Penalties) युरो कपच्या या फायनलनंतर न्यूझीलंडचा ऑल राऊंडर जिमी नीशम (Jimmy Neesham) याने ट्विट करत आयसीसीला (ICC) टोला लगावला आहे. ‘पेनल्टी शूटआऊट का? ज्या टीमनं जास्त पास केले असतील त्या टीमला विजेतेपद का नाही?’ असा प्रश्न निशमनं ट्विट करत विचारला आहे. त्याचबरोबर या ट्विटला #joking असा हॅशटॅगही नीशमनं वापरला आहे. त्याचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे.
Why is it a penalty shootout and not just whoever made the most passes wins? 👀 #joking 😂
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) July 11, 2021
नीशमच्या ट्विटचा संदर्भ काय? दोन वर्षांपूर्वी लॉर्ड्सवर झालेल्या वन-डे वर्ल्ड कप फायनलशी नीशमच्या या ट्विटचा संदर्भ आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) या दोन देशांमध्ये ती फायनल झाली होती. त्या फायनलमध्ये निर्धारित 100 ओव्हर्स आणि दोन सुपर ओव्हर्सनंतरही दोन्ही टीमचे रन समान होते. त्यानंतर संपूर्ण सामन्यात जास्त फोर लगावल्याच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. घरच्याच मैदानावर इंग्लंडचा स्वप्नभंग; इटलीनं पटकावलं यूरो जेतेपद आयसीसीच्या या नियमावर त्यानंतर जोरदार टीका झाली होती. या टीकेनंतर आयसीसीनं अखेर हा नियम आता बदलला आहे. मात्र फायनलमध्ये आयसीसीच्या विचित्र नियमाचा फटका आपल्या टीमला बसला याचे शल्य नीशमला आजही आहे. हेच त्याच्या या ट्विटमधून दिसून येत आहे.