मुंबई, 26 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला गोल्ड मेडल जिंकवून देणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) संतापला आहे. काहीच दिवसांपूर्वी त्याने दिलेल्या मुलाखतीमध्ये फायनलवेळी घडलेला एक किस्सा सांगितला होता. पाकिस्तानचा भालाफेक करणारा अर्शद नदीम (Arshad Nadeem) याने फायनलच्या काही वेळ आधी आपला भाला हातात घेतला होता, असं नीरज म्हणाला. यानंतर वाद निर्माण झाला आणि अर्शद नदीमला ट्रोल करायला सुरुवात करण्यात आली. हा वाद वाढल्यानंतर आता नीरजने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या वक्तव्याला तुमचा अजेंडा बनवू नका, असं नीरज म्हणाला आहे. याचा एक व्हिडिओ त्याने शेयर केला आहे. थ्रो फेकण्याच्या आधी प्रत्येक जण स्वत:चा भाला तिकडे ठेवतो. त्यामुळे कोणताही खेळाडू तिकडे जाऊन भाला उचलू शकतो आणि सराव करू शकतो. हा एक नियम आहे आणि यात वाईट काहीच नाही, अशी प्रतिक्रिया नीरजने या व्हिडिओमध्ये दिली आहे.
मेरी आप सभी से विनती है की मेरे comments को अपने गंदे एजेंडा को आगे बढ़ाने का माध्यम न बनाए। Sports हम सबको एकजूट होकर साथ रहना सिखाता हैं और कमेंट करने से पहले खेल के रूल्स जानना जरूरी होता है 🙏🏽 pic.twitter.com/RLv96FZTd2
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 26, 2021
‘अर्शद आपला सराव करत होता, मग मी माझा भाला मागितला. माझा सहारा घेऊन अनेक जण याचा मुद्दा करत आहेत, पण असं करू नका. खेळ सगळ्यांना एकत्र घेऊन जायला शिकवतो. सगळे खेळाडू एकत्र प्रेमाने राहतात. आम्हाला ठेच पोहोचेल, अशी कोणतीही वक्तव्य करू नका,’ असं आवाहन नीरजने केलं. काय म्हणाला होता नीरज? ‘मी फायनलपूर्वी माझा भाला शोधत होतो. तो मला सापडत नव्हता. त्यावेळी मी पाहिलं की अर्शद नदीम माझा भाला घेऊन फिरत आहे. ते पाहून मी त्याला सांगितलं की, ‘भाई, हा माझा भाला आहे. तो मला दे. मला त्यानं थ्रो करायचा आहे. त्यानंतर त्यानं तो भाला मला दिला. या सर्व प्रकारामुळे माझ्या पहिल्या थ्रोवर परिणाम झाला. मी पहिला थ्रो घाईमध्ये फेकला होता.’ असा अनुभव नीरजनं सांगितला आहे. अर्शद नदीम (Arshad Nadeem) हा पाकिस्तानचा भालाफेकपटू आहे. तो देखील टोकयो ऑलिम्पिकमध्ये फायनलसाठी पात्र झाला होता. ऑलिम्पिक फायनल खेळणारा तो पाकिस्तानचा पहिलाच भालाफेकपटू आहे. त्याला मेडल मिळवण्यात मात्र अपयश आले. तो फायनलमध्ये पाचव्या क्रमांकावर होता.