नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी: यावर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2021) मधील भारताची सर्वात मोठी पदकाची दावेदार असलेली शूटर मनू भाकरला (Manu Bhakar) दिल्ली विमानतळावर अपमानित करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. एअर इंडियाच्या (Air India) अधिकाऱ्यांनी सर्व योग्य कागदपत्रं सोबत असूनही आपल्याला भोपाळला जाणाऱ्या विमानात बसू दिलं नाही. इतकंच नाही तर अधिकाऱ्यानं पैशांची मागणी केली , असा आरोप तिनं केला. या प्रकरणावर भाकर हिनं शुक्रवारी पाच ट्विट केले. त्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री किरेण रिजीजू (Kiren Rijiju) यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर भाकरला भोपाळच्या विमानात बसता आलं. काय आहे प्रकरण? भारताच्या सर्वात तरुण शूटरनं तिच्या ट्वीटमध्ये म्हंटलं आहे, ‘मी दिल्ली विमानतळावरुन भोपाळला ट्रेनिंगसाठी जात आहे. मला ट्रेनिंगसाठी शस्त्र आणि गोळ्यांची गरज आहे. एअर इंडिया अधिकाऱ्यांना विनंती आहे की, तुम्ही सन्मान देऊन शकत नसाल तर कृपया खेळाडूंचा अपमान करु नका. पैशांची मागणी करु नका. माझ्याकडं डीजीसीएची (Directorate General of Civil Aviation) परवानगी आहे.’
त्यानंतरच्या ट्वीटमध्ये भाकर म्हणते, ‘मला दिल्लीहून विमानात बसण्याची परवानगी नाही. सर्व प्रकारचे कागदपत्रं आणि DGCA ची परवानगी असूनही माझ्याकडून आता 10, 200 रुपयांची मागणी केली जात आहे. प्रवास करण्यासाठी लाच द्यावी लागेल का? एअर इंडियाचे प्रभारी मनोज गुप्ता डीजीसीएला मान्यता देत नाहीत. तिनं या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांना देखील टॅग केलं होतं.
Not allowing me to board flight AI 437 at IGI Delhi and asking now 10200rs Despite all valid Documentation and DGCA permit . Top of that Manoj Gupta Air india incharge doesn’t recognise DGCA @narendramodi @HardeepSPuri @AmitShah @VasundharaBJP shall I pay this Bribes or!!!! pic.twitter.com/1lnkoUxNiP
— Manu Bhaker🇮🇳 (@realmanubhaker) February 19, 2021
मनू भाकरनं या विषयावर आणखी तीन ट्वीट केले. त्यानंतर तिनं आणखी एक ट्विट करत केंद्रीय क्रीडा मंत्री किरेण रिजीजू यांचे आभार मानले. ‘धन्यवाद, रिजीजू सर. तुमच्या भक्कम पाठिंब्यामुळेच मी आता विमानात बसली आहे. जय हिंद.’’ असं सांगत हा पेच सुटल्याचं तिनं सांगितलं.
कोण आहे मनू भाकर? मनू भाकर ही सध्या देशातील नंबर 1 शूटर आहे. तिनं 2018 साली वयाच्या 16 व्या वर्षीच वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. ही कामगिरी करणारी ती भारताची सर्वात तरुण शूटर आहे.