मुंबई, 14 जून : दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मॅचच्या सीरिजसाठी (India vs South Africa T20 Series) टीम इंडियात निवड करण्यात आली आहे, पण त्याला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) संधी मिळणार का? याबाबत अजूनही शंका आहे. आयपीएल 2022 मध्ये आरसीबीकडून खेळताना दिनेश कार्तिकने धमाका केला होता, ज्यामुळे त्याचं टीम इंडियामध्ये कमबॅक झालं. दुसऱ्या टी-20 मध्ये कार्तिकने 21 बॉलमध्ये नाबाद 30 रनची खेळी केली होती. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मते दिनेश कार्तिकला टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी मिळणार नाही. याचं कारणही गंभीरने सांगितलं आहे.
स्टार स्पोर्ट्सचा शो मॅच पॉईंट्समध्ये गंभीरने कार्तिकच्या 30 रनच्या खेळीवर चर्चा केली. 'कार्तिकची ती खेळी खूप महत्त्वाची होती. मागच्या दोन-तीन महिन्यांमध्ये तो आरसीबीसाठी हेच करत आहे, पण टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याची निवड करणं सोपं असणार नाही,' असं गंभीर म्हणाला.
'आताच काही बोलणं खूप लवकर होईल, कारण टी-20 वर्ल्ड कपला अजून बराच वेळ आहे. तोपर्यंत कार्तिकला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. जर त्याला फक्त शेवटच्या 3 ओव्हरमध्येच बॅटिंग करायची असेल, तर गोष्टी कठीण होतील. भारताला टॉप-7 मध्ये अशा खेळाडूची गरज आहे जो बॉलिंगमध्येही पर्याय देऊ शकेल. या परिस्थितीमध्ये अक्षर पटेल चांगला पर्याय आहे,' अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली.
'या परिस्थितीमध्ये मी कार्तिकला टीममध्ये ठेवणार नाही. टीमकडे ऋषभ पंत आणि दीपक हुड्डासारखे खेळाडू आहेत. केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा यांचं टीममध्ये कमबॅक होईल, तेव्हा कार्तिकला टीममध्ये स्थान टिकवून ठेवणं कठीण होणार आहे. जर तुम्ही त्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये जागा देऊ शकणार नसलात तर त्याला टीममध्येही घेण्यात काही अर्थ नाही,' असं स्पष्ट मत गंभीरने मांडलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup, Team india