मुंबई, 17 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत असून यात ऑस्ट्रेलीया संघाने मुंबईच्या रस्त्यांवर खेळलेल्या डेव्हिड वॉर्नरला प्लेईंग 11 मध्ये जागा दिली नाही. पहिल्या वनडे सामन्यातील डेव्हिड वॉर्नरच्या मैदानातील अनुपस्थितीमुळे त्याचे चाहते काहीसे नाराज झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका उरकून ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर हा वनडे मालिका खेळण्यासाठी मुंबईत दाखल झाला होता. भारतात डेव्हिड वॉर्नरचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याने मुंबईत दाखल होताच टॅक्सी ड्रायव्हर सोबत फोटो काढून चाहत्यांचे मन जिंकले. तर त्यानंतर लहान मुलांसोबत मुंबईच्या रस्त्यांवर गली क्रिकेटचा देखील आनंद लुटला. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा वॉर्नरला मैदानात पाहण्याची इच्छा होती. परंतु पहिल्या सामन्यात वॉर्नरला प्लेईंग 11 बाहेर ठेवण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ याने टॉस जिंकल्यानंतर डेव्हिड वॉर्नर हा दुखापतीमुळे प्लेईंग 11 मध्ये खेळणार नाही असे सांगितले. दिल्ली येथील कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजचा चेंडू हातावर आदळून वॉर्नर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला पुढील दोन्ही सामन्यात विश्रांती देण्यात आली. भारत विरुद्ध वनडे मालिकेत वॉर्नर फिट होऊन पुन्हा संघात परतेल अशी अपेक्षा चाहत्यांना होती. परंतु वॉर्नर अजूनही दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे चाहत्यांना त्याला मैदानावर पाहण्यासाठी काहीकाळ वाट पाहावी लागेल.