मेलबर्न, 22 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरनं आज इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत खणखणीत शतक ठोकलं. महत्वाचं म्हणजे वॉर्नरच्या बॅटमधून निघालेलं हे गेल्या 1043 दिवसातलं पहिलंच आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. गेल्या तीन वर्षांपासून वॉर्नर धावा तर करत होता. पण त्याच्या बॅटमधून एकही शतक निघालं नव्हतं. पण आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर त्यानं वन डे कारकीर्दीतलं 19 वं शतक साजरं केलं. पण याच इनिंगनंतर वॉर्नरनं असं काही केलं की ज्याने स्टेडियममधील सर्वांची मनं जिंकली. वॉर्नरकडून छोट्या फॅन्सना सरप्राईज गिफ्ट वॉर्नरनं आज मेलबर्नमध्ये 106 धावांची खेळी केली. बाद झाल्यानंतर वॉर्नर पॅव्हेलियनमध्ये परतत होता. पण त्याचवेळी तिथे असलेल्या एका मुलाला त्यानं आपले ग्लोव्हज दिले. हे ग्लोव्हज मिळाल्यानं त्या मुलाला कमालीचा आनंद झाला. त्यानं हे ग्लोव्हज स्टेडियममध्ये बसलेल्या आपल्या भावाला आणि आईला दाखवले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरही आश्चर्याचे भाव होते. वॉर्नरच्या या कृतीचं मैदानातल्या प्रेक्षकांसह सोशल मीडियातही अनेकांनी तोंडभरुन कौतुक केलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायर होत आहे.
These kids can't believe their luck! ✨#AUSvENG | @davidwarner31 pic.twitter.com/t2Qqhu3GNR
— cricket.com.au (@cricketcomau) November 22, 2022
वॉर्नरचं शतक खास या सामन्यात ट्रेव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नरनं तब्बल 269 धावांची सलामी दिली. हेडनं 152 धावा फटकावल्या. पण वॉर्नरसाठी मात्र आजची खेळी खास ठरली. त्यानं 2019 साली शेवटचं शतक झळकावलं होतं. त्यानंतर तब्बल 1043 दिवसांनी वॉर्नरनं शतकी खेळी साकारली आहे. वॉर्नर आणि हेडच्या शतकांनी ऑस्ट्रेलियाला 355 धावांचा डोंगर उभारुन दिला. त्यानंतर झॅम्पा आणि पॅट कमिन्ससमोर इंग्लंडचा डाव 142 धावातच आटोपला.
हेही वाचा - FIFA WC 2022: धक्कादायक… मेसीच्या अर्जेन्टिनाला ‘या’ टीमनं दिला पराभवाचा जोरदार झटका, पुढची वाट बिकट? वर्ल्ड चॅम्पियनना कांगारुंचा दणका दरम्यान वन डे आणि टी20 चॅम्पियन असलेल्या इंग्लंडला या मालिकेत ऑस्ट्रेलियानं व्हाईटवॉश दिला. तिन्ही वन डे जिंकून ऑस्ट्रेलियानं ही मालिका खिशात घातली. त्यामुळे ऑस्ट्रेलियातच टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जोस बटलरच्या इंग्लंड संघाला कांगारुंविरुद्धच्या वन डे मालिकेत मात्र हार स्वीकारावी लागली.

)







