मुंबई, 24 जून: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final 2021) टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव झाला. या पराभवानंतर " टेस्ट टीमला मजबूत करण्यासाठी काय करावं याचा विचार केला जाईल. यासाठी एक वर्ष वाट पाहणार नाही. योग्य व्यक्तींना योग्य ठिकाणी आणण्याची गरज आहे." असे मत कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) व्यक्त केले होते. त्यानंतर आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला आजवर एकदाही आयसीसी (ICC) स्पर्धेचं विजेतेपद पटकावता आलेलं नाही. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याची कामगिरी टीम इंडियानं केली होती. त्यानंतर मायदेशातील कसोटी मालिकेत इंग्लडचा सहज पराभव केला. या दोन मालिका विजयानंतर टीम इंडिया आयसीसी विजेतेपदाची प्रतीक्षा संपवेल अशी अपेक्षा होती. पण फायनल मॅचमध्ये पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला. या पराभवानंतर शास्त्रींनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
" या परिस्थितीमधील अधिक चांगली टीम जिंकली. विश्वविजेपदासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर ते या विजेतेपदासाठी पात्र होते. मोठी गोष्ट सहज मिळत नाही, याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. न्यूझीलंडनं छान खेळ खेळला. रिस्पेक्ट." असे ट्विट शास्त्रींनी केले आहे.
Better team won in the conditions. Deserved winners after the longest wait for a World Title. Classic example of Big things don't come easy. Well played, New Zealand. Respect.
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) June 24, 2021
ICC वर व्यक्त केली होती नाराजी
रवी शास्त्री यांनी टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी आयसीसीवर नाराजी व्यक्त केली होती. वढ्या मोठ्या स्पर्धेचा निर्णय एका फायनलवरून होऊ नये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये तीन मॅचची फायनल झाली पाहिजे, असं मत शास्त्रींनी व्यक्त केले होते.
'ही न्यूझीलंडची आजवरची बेस्ट टीम', दिग्गजानं थोपटली विल्यमसनची पाठ
'टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 3 मॅचची झाली पाहिजे, फक्त एका मॅचवरून निर्णय घेणं योग्य नाही. आम्ही एका मॅचसाठीही तयार आहोत. या फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच नाही, तर अनेकवेळा कठीण परिस्थितीमधून आम्ही स्वत:ला बाहेर काढलं आणि सीरिज जिंकल्या,' असं शास्त्री म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Ravi shastri