मुंबई, 10 जून : रणजी करंडक स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईनं उत्तराखंडचा 725 रननं पराभव केला. फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव आहे. उत्तराखंडच्या क्रिकेट टीमच्या (Uttarakhand Cricket Team) खराब कामगिरीचं कारण आता उघड झालं आहे. या मॅचच्या दरम्यान उत्तराखंडचे खेळाडू भूकेनं व्याकूळ होते. त्यांना कोणताही दैनिक भत्ता (DA) मिळाला नव्हता. Swiggy किंवा Zomato वरून जेवायची व्यवस्था करा, असा सल्ला त्यांना दिला होता. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण या खेळाडूंना दैनिक भत्ता म्हणून फक्त 100 रूपये दिले जात आहेत. याचाच अर्थ उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये मजुरांना मिळणाऱ्या दैनिक भत्त्यापेक्षाही कमी रक्कम त्यांना दिली जात आहे. ‘न्यूज 9’ नं दिलेल्या वृत्तामध्ये या धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला आहे. या वृत्तानुसार एका खेळाडूनं दैनिक भत्त्यासाठी टीमच्या मॅनेजरकडं विचारणा केली. त्यावेळी त्याला स्वत:च खर्चाची व्यवस्था करावी असा सल्ला देण्यात आला. ‘सतत प्रश्न का विचारतोस? स्विगी की झोमॅटोवरून खाण्याची व्यवस्था कर,’ असा सल्ला या खेळाडूला देण्यात आला. या प्रकरणातील एका धक्कादाय खुलाशानुसार अधिकृतपणे उत्तराखंडच्या खेळाडूंना 1500 रूपये दैनिक भत्ता निश्चित आहे. तो आता वाढवून 2000 रूपये करण्यात आला आहे. त्यानंतरही मागील वर्षभरापासून क्रिकेटपटूंना दररोज 100 रूपये देखील मिळत नाहीत. 35 लाखांच्या केळी टीम निवडीपासून ते बॅकरूम स्टाफच्या नियुक्तीपर्यंत अनेक क्षेत्रामध्ये आर्थिक प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात उत्तराखंड क्रिकेट असोसिएशननं (CAU) ऑडिट रिपोर्ट दिला होता. या रिपोर्टवरही खेळाडूंनी आक्षेप घेतला होता. खेळाडूंनी मॅच फिस आणि दैनिक भत्ते पूर्ण मिळत नसल्याचा दावा केला होता, अशी माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. CAU नं या स्पर्धा तसंच निवड चाचणीमधील फूड सेक्शन आणि कॅटरींगसाठी 1,74,07,346 रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. दैनिक भत्ता म्हणून देण्यात येणारी रक्कम 49,58,750 खर्च करण्यात आले असून केळी खरेदीसाठी 35 लाख खर्च करण्यात आले असून पाण्याच्या बाटल्यांसाठी 22 लाख रूपये खर्च करण्यात आल्याचा दावा उत्तराखंड क्रिकेट असोसिएशननं केला आहे. सलाम! नक्षली हल्ल्यात वडील गमावले, मुलीनं नॅशनल रेकॉर्डसह पटकावलं गोल्ड मेडल असोसिएशनकडून अनेक दावे केले जात असले तरी खेळाडूनं मॅनेजमेंटवर मानसिक छळ केल्याचाही आरोप केला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीनं गुरूवारीच एक ट्विट करत राज्यातील क्रीडा धोरणानुसार तरूणांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्याच दिवशी खेळाडूंची ही अवस्था समोर आलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.