मुंबई, 29 जानेवारी : अंडर 19 वर्ल्ड कपमधील (Under-19 World Cup) चौथा आणि शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आज (शनिवार) होणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात हा सामना होईल. या लढतीपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन यश ढूलसह (Yash Dhull) 5 खेळाडू कोरोनामधून बरे झाले आहेत. त्यामुळे ते सर्वजण या सामन्यासाठी उपलब्ध असतील. पण, त्याचवेळी भारतीय टीममधील आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. यश ढूलच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाचे नेतृत्त्व केलेला निशांत सिंधू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. निशांतला आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले असून तो नॉक आऊट सामन्यासाठी उपलब्ध नसेल. अनिश्वर गौतम त्याच्या जागी खेळेल. यापूर्वी भारतीय टीममधील सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे टीम इंडियाला उपलब्ध सर्व 11 खेळाडूंसह मैदानात उतरावं लागले होते. आयर्लंड विरूद्धच्या मॅचपूर्वी कॅप्टन यश ढूल, व्हाईस कॅप्टन शेख रशिद, सिद्धार्थ यादव, आराध्य यादव आणि मानव परीख हे सर्व जण पॉझिटिव्ह आढळले होते. आता बांगलादेश विरूद्ध होणाऱ्या क्वार्टर फायनलमध्ये निशांतचा अपवाद वगळता सर्व भारतीय खेळाडू फिट आहेत, अशी माहिती आयसीसीच्या सूत्रांनी दिली आहे. यश ढूल आणि अन्य पाच खेळाडू शुक्रवारी त्रिनिदाद होऊन एंटीगामध्ये दाखल झाले आहेत. क्वार्टर फायनलपूर्वी त्यांना सराव करण्यासाठी फारसा वेळ नाही. फक्त एक दिवस सराव करून क्वार्टर फायनल खेळण्याचं आव्हान या खेळाडूंसमोर आहे. U19 वर्ल्ड कपवर कोरोना अटॅक! 2 मॅच रद्द, एकाच टीमचे 9 खेळाडू पॉझिटिव्ह भारतीय टीम : यश ढूल (कॅप्टन), शेख राशिद (उप कप्तान), आराध्य यादव, दिनेश बाना, राज बावा, अनिश्वर गौतम, राजवर्धन हंगरगेकर, हरनूर सिंह, मानव पारख, विक्की ओस्तवाल, अंगकृष रघुवंशी, रवी कुमार, गर्व सांगवान, सिद्धार्थ यादव, निशांत सिंधू, कौशल तांबे आणि वासू वत्स.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.