Home /News /sport /

U19 World Cup 2022: CRPF जवानाचा मुलगा ठरला देशाचा हिरो, वडिलांची भावुक प्रतिक्रिया

U19 World Cup 2022: CRPF जवानाचा मुलगा ठरला देशाचा हिरो, वडिलांची भावुक प्रतिक्रिया

टीम इंडियानं अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये (Under 19 World Cup 2022) प्रवेश केला. भारतीय टीमनं क्वार्टर फायनलमध्ये मिळवलेल्या विजयाचा हिरो CRPF जवानाचा मुलगा ठरला आहे.

    मुंबई, 31 जानेवारी:  टीम इंडियानं अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये (Under 19 World Cup 2022) प्रवेश केला. भारतीय टीमनं क्वार्टर फायमलमध्ये गतविजेत्या बांगलादेशचा (India U19 vs Bangladesh U19) 5 विकेट्सनं पराभव केला. डावखुरा फास्ट बॉलर रवी कुमार (Ravi Kumar) या विजयाचा हिरो ठरला. रवीनं 7 ओव्हर्समध्ये फक्त 14 रन देत 3 विकेट्स घेतल्या. रवीचे वडील राजिंदर सिंह हे सीआरपीएफमध्ये (CRPF) जवान आहेत. मुलाच्या यशानंतर 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना त्यांनी भावुक प्रतिक्रिया दिली आहे. 'आज सीआरपीएफच्या सर्व कँपमध्ये माझी आणि माझ्या मुलाची चर्चा आहे. कालपर्यंत मला इथं कुणीही ओळखत नव्हतं. आज सर्व मला ओळखतात. सर्व सिनिअर फोन करून माझं अभिनंदन करत आहेत. या आनंदाचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत.' अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. रवीनं केला शब्द खरा वर्ल्ड कपमधील यशाचा आनंद साजरा करण्यासाठी रवीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. यामध्ये वडिलांचा पगार, आईची काळजी आणि लोकांचे टोमणे यांचा समावेश आहे. रवी सतत क्रिकेट खेळत असल्यानं त्याची आई काळजी करत असे. त्यानं अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं तिचं मत होतं. पण रवीला क्रिकेटचा ध्यास होता. 'तू आज मला क्रिकेट खेळण्यापासून अडवत आहेस. पण, एक दिवस तू मला क्रिकेट खेळताना टीव्हीवर पाहशील,' असे रवीने आईला सांगितले होते. रवीनं हा शब्द खरा केल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितले. राजिंदर सिंह यांनी यावेळी पुढे म्हणाले की, 'माझ्याकडं इतके पैसे नव्हते. तसंच भारताकडून खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक अशा सुविधा देखील मी रवीला देऊ शकत नव्हतो. तुझ्यात क्षमता असेल तर तो देशाकडून नक्की खेळशील इतकंच मी त्याला सांगितले होते.' एकाच मॅचमध्ये 3 जणांची दमदार खेळी, आयपीएल लिलावात लागणार मोठी बोली रवीला मिळाली वडिलांकडून प्रेरणा रवीनं टीम इंडियात प्रवेश करण्यापूर्वी बराच संघर्ष केला आहे. या प्रवासात हताश झाल्यावर त्याला नेहमी वडिलांकडून प्रेरणा मिळाली आहे. पुढे काय होणार? कशाचा सामना करावा लागेल याची पर्वा न करता आपले वडील रोज जंगलात जातात. ते आमच्यासाठी इतकं धोकादायक काम करू शकतात, तर मी कष्ट का करू शकत नाही,' असे रवीला वाटत असे. त्यामधूनच त्याला प्रेरणा मिळाली आणि आज तो भारतामधील  अंडर 19 टीममधील प्रमुख बॉलर बनला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Cricket news, CRPF, Sports, Team india, World cup india

    पुढील बातम्या