मुंबई, 11 सप्टेंबर: टी 20 वर्ल्ड कपसाठी सर्व टीमची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेनं (South Africa Cricket Team) टीम जाहीर करताच त्यांच्या अनुभवी खेळाडूनं बोर्डावर गंभीर आरोप केला आहे. या टीममध्ये माजी कॅप्टन फाफ ड्यू प्लेसी (Faf Du Plesis), ख्रिस मॉरीस (Chris Morris) आणि इम्रान ताहीर (Imran Tahir) या खेळाडूंची निवड करण्यात आलेली नाही. बोर्डाच्या या निर्णयावर नाराज होत दिग्गज क्रिकेटपटूनं प्रशासनावर आरोप केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर आणि टी20 स्पेशालिस्ट बॉलर इम्रान ताहिरनं दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) यांच्यावर आरोप केला आहे. स्मिथनं टीममध्ये निवड करण्याचं वचन दिलं होतं, मात्र त्याने तो शब्द पाळला नसल्याचा दावा ताहिरनं केला आहे. ताहिरनं ‘इंडिपेंडंट ऑनलाईन’ शी चर्चा करताना सांगितलं की, ‘स्मिथनं मागच्या वर्षी मला जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलेलं नाही. तू टी 20 वर्ल्ड कप खेळावा अशी माझी इच्छा आहे, असं स्मिथनं मागच्या वर्षी सांगितलं होतं. मागच्या वर्षी वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होणार होता. वर्ल्ड कप खेळण्यासाठी मी तयार आहे. तुम्ही मला जो सन्मान दिला आहे, त्यामुळे मी खूप आनंदी असल्याचं त्यांना सांगितलं होतं.’ असा दावा ताहिरनं केला आहे. मी सातत्यानं कष्ट करत आहे. तुम्ही माझी वेगवेगळ्या टी20 लीगमधील कामगिरी पाहू शकता. याच कारणामुळे स्मिथनं मला वर्ल्ड कप खेळण्यासाठी सांगितलं होतं. या विषयावर एबी डिव्हिलियर्स आणि फाफ ड्यू प्लेसी या खेळाडूंशी चर्चा केली जाईल, असंही मला सांगण्यात आले होते. पण, नंतर कुणी माझ्याशी संपर्क केला नाही.’ असं ताहिरनं सांगितलं. ताहीरनं यावेळी दक्षिण आफ्रिका टीमचे कोच मार्क बाऊचरवरही नाराजू व्यक्त केली आहे. ‘बाऊचरनं मुख्य कोच झाल्यापासून माझ्याशी एकदाही संपर्क साधला नाही. पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यांनी मी बाऊचर आणि स्मिथ दोघांनाही मेसेज केला होता. त्याचं कोणतही उत्तर मला मिळालं नाही. मी 10 वर्ष देशाची सेवा केली. मला योग्य सन्मानाची अपेक्षा होती. पण ही मंडळी मला बेकार समजतात,’ अशी खंत बाऊचरनं बोलून दाखवली आहे. IND vs ENG: टीम इंडियाच्या खेळाडूंची उडाली होती झोप, रात्रभर सतावत होती ‘ती’ काळजी! इम्रान ताहीरनं 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपनंतर वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र तो टी 20 क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध आहे. सध्या तो जगभरातील टी 20 लीगमध्ये क्रिकेट खेळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.