मुंबई, 9 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील मालिकेला 13 जुलैपासून सुरुवात होत आहे. दोन्ही देशांमध्ये पहिल्यांदा तीन सामन्यांची वन-डे मालिका खेळवली जाईल. त्यानंतर टी 20 मालिका होणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियात शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वात अनेक तरुण खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची एक चांगली संधी मिळणार आहे. दुसरिकडं श्रीलंका क्रिकेट बोर्डासाठी (SLC) देखील ही मालिका खास आहे. या मालिकेतून बोर्डाची भक्कम कमाई होणार आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा (Shammi Silva) यांनीच याबाबतचा खुलासा केला आहे. त्यांच्या मतानुसार भारताच्या या सीरिजमधून बोर्डाला तब्बल 90 कोटी मिळणार आहेत. 'इनसाईड स्पोर्ट्स' ने हे वृत्त दिलं आहे. 'आम्ही सुरुवातीला 3 सामन्यांचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बीसीसीआयशी झालेल्या चर्चेनंतर सामन्यांची संख्या 6 पर्यंत वाढवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. यामुळे बोर्डाच्या महसूलात अतिरिक्त 6 दशलक्ष डॉलर्सची भर पडणार आहे,' असे सिल्वा यांनी स्पष्ट केले.
सिल्वा यांनी पुढे सांगितले की, 'भारताविरुद्धच्या मालिकेमुळे श्रीलंका क्रिकेटला मोठा फायदा होणार आहे. खेळाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या क्रीडा मंत्र्यांच्या धोरणाला हे सुसंगत आहे. कोरोनामुळे अनेक नियोजित मालिका रद्द झाल्या. त्यानंतरही आम्ही खेळाडूंचे वेतन आणि मासिक भत्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारची कपात केलेली नाही. त्यांना सर्व सुविधा पूर्वीसारख्याच मिळत आहेत. आता खेळाडूंनी देशासाठी सर्वोत्तम खेळ केला पाहिजे.'
पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तर नाराज, म्हणाला...
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील ही मालिका मागील वर्षी होणार होती. कोरोना व्हायरसमुळे ती स्थगित करावी लागली होती. त्यामुळे आता ही मालिका होत आहे. बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे.भारताविरुद्ध मालिका खेळली तर त्याचा इतर बोर्डांना मोठा फायदा होतो.
भारतीय प्रेक्षकांना मॅच दाखवण्यासाठी असलेल्या टीव्ही राईट्सच्या विक्रीतून मोठी कमाई होते. भारत-श्रीलंका मालिकेच्या प्रसारणाचे हक्क हे सोनी स्पोर्ट्सकडे आहेत. त्याचबरोबर स्पॉनर्सच्या माध्यमातूनही श्रीलंका क्रिकेट बोर्डाची चांगली कमाई होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India Vs Sri lanka