मुंबई, 8 जानेवारी : ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) हा क्रिकेटच्या मैदानावरील रेकॉर्ड बरोबरच मैदानाबाहेरील प्रकरणामुळे देखील कायम चर्चेत असतो. वॉर्नची कारकिर्द देखील वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरली. निवृत्तीनंतरही वॉर्न कायम चर्चेत असतो. शेन वॉर्नने नुकताच त्याच्या कारकिर्दीमधील मॅच फिक्सिंगच्या प्रयत्नाचा नेमका घटनाक्रम सांगितला आहे. ‘अॅमेझॉन प्राईम’ वरील आगामी डॉक्युमेंट्रीमध्ये वॉर्ननं हा सर्व प्रकार सविस्तर सांगितला आहे. ऑस्ट्रेलियाची टीम 1994 साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी कराचीमध्ये झालेल्या टेस्टच्या चौथ्या दिवसानंतर पाकिस्तान टीमचा तेव्हाचा कॅप्टन सलिम मलिक (Salim Malik) याने आपल्याला खराब खेळण्यासाठी 276,000 डॉलरची ऑफर केली होती, असे वॉर्नने यामध्ये सांगितले आहे. ‘कराची टेस्टमध्ये पाकिस्तानला पराभूत करण्याता आम्हाला पूर्ण विश्वास होता. त्यावेळी चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मलिकनं मला भेटण्याची इच्छा केली. मी त्याच्या रूममध्ये गेलो. त्यावेळी मी त्याला उद्या आम्ही मॅच जिंकू, असे सांगितले. त्यावर मलिकनं आम्ही मॅच हरू शकत नाही. आम्ही पाकिस्तानमध्ये हरलो तर लोकं आमची घरं जाळतील, असा दावा केला. मलिकनं मला आणि माझ्या सहकाऱ्याला 276,000 डॉलरची लाच देऊ केली होती. मी वाईड बॉल टाकावे आणि विकेट घेण्याचा प्रयत्न करू नये यासाठी ही ऑफर होती.’ असा खुलासा वॉर्ननं केला आहे. मलिकनं अशा प्रकारची ऑफर केल्यानं मला धक्काच बसला होता, असे वॉर्नने स्पष्ट केले. धोनीनं पुन्हा जिंकलं मन, पाकिस्तानच्या खेळाडूला दिलं खास गिफ्ट ‘मला नेमकं काय बोलावं हे समजत नव्हते. तीस वर्षांपूर्वी मॅच फिक्सिंग हा प्रकार कुणालाही माहिती नव्हता. त्याबद्दल कधीही चर्चा होत नसे, आम्ही तुम्हाला पराभूत करू इतकेच मी म्हणालो,’ अशी आठवण वॉर्ननं सांगितली. त्यानंतर आपण या सर्व प्रकाराची माहिती ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मार्क टेलर आणि कोच बॉब टेलर यांना दिली. त्यांनी हे प्रकरण रेफ्रींपर्यंत पोहचवले असा दावा वॉर्नने केला आहे. सलिम मलिकवर पुढे 2000 साली मॅच फिक्सिंग प्रकरणातील आरोपांमुळे आजीवन बंदी घालण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.