Home /News /sport /

मुंबईच्या झोपडपट्टीत राहिलेल्या क्रिकेटरची अर्जुन तेंडुलकरवर मात, भावानं गाजवलाय वर्ल्ड कप

मुंबईच्या झोपडपट्टीत राहिलेल्या क्रिकेटरची अर्जुन तेंडुलकरवर मात, भावानं गाजवलाय वर्ल्ड कप

क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द, कष्ट आणि प्रतिभा या 3 गोष्टींची आवश्यकता असते. या गोष्टींच्या जोरावर सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी होता येतं. हे मुंबईच्या झोपटपट्टीत राहिलेल्या क्रिकटपटूनं दाखवून दिलं आहे.

    मुंबई, 24 मे : क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द, कष्ट आणि प्रतिभा या 3 गोष्टींची आवश्यकता असते. या गोष्टींच्या जोरावर सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी होता येतं. हे अनेक क्रिकेटपटूंनी दाखवून दिलंय. सर्फराज खान (Sarfaraz Khan) आणि  मुशीर खान ( Musheer Khan) ही भावंड देखील याचं ताजं उदाहरण आहे. मुशीरची वयाच्या 18 व्या वर्षी मुंबईच्या रणजी टीममध्ये निवड झाली आहे. त्यानं टीम निवडीत सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि मुंबई इंडियन्सचा सदस्य अर्जुन तेंडुलकरवर (Arjun Tendulkar) मात करण रणजी टीममध्ये जागा मिळवली आहे. मुशीरचा मोठा भाऊ असलेल्या सर्फराजनं नाव हे भारतीय क्रिकेटला आता नवं नाही. 2016 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सर्फराजनं टीम इंडियाकडून सर्वात जास्त 355 रन केले. गेल्या काही वर्षांपासून तो रणजी क्रिकेटमध्ये भरपूर रन करत टीम इंडियाचं दार ठोठावत आहेत. तसंच या आयपीएल सिझनमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमचा सदस्य होता. सर्फराजच्या पावलावर पाऊल टाकून मुशीरच्या क्रिकेटचा प्रवास सुरू झाला आहे.  ओपनर आणि डावखुरा स्पिनर असलेल्या मुशीरने अंडर-19 कूचबिहार ट्रॉफीमध्ये नऊ मॅचेसमध्ये 67 च्या सरासरीने 670 रन केले होते. त्यात दोन शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता. मागच्या वर्षी तो अ विभाग पोलीस शील्ड आणि माधव मंत्री एकदिवसीय स्पर्धेत ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ ठरला होता. परंतु, मुशीर आणि सर्फराज यांचा झोपडपट्टीपासूनचा ते व्यावसायिक क्रिकेट खेळण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. या दोघांचे वडील नौशाद खान (Naushad Khan) यांनी खूप मेहनत, संघर्ष आणि त्याग करून आपल्या मुलांना क्रिकेटपटू बनवलंय. त्यांचीच कहाणी जाणून घेऊयात. या संदर्भात 'जनसत्ता'नं वृत्त दिलंय. प्रवास सोपा नव्हता सर्फराज आणि मुशीर यांचे वडील क्रिकेट कोच (Cricket Coach) आहेत. नौशाद खान यांनी एका क्रिकेटरला प्रशिक्षण दिलं होतं, परंतु त्यानेच एकेदिवशी टोमणा मारल्यानंतर आपल्या मुलांना प्रोफेशनल क्रिकेटर बनवण्याची जिद्द नौशाद यांच्या मनात निर्माण झाली. या संदर्भातला एक किस्सा नौशाद यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितला होता. तो खेळाडू म्हणाला होता, “माझ्यात प्रतिभा होती म्हणून मी खेळलो. तुमच्याकडे टॅलेंट असेल तर मुलांना खेळाडू बनवून दाखवा ना.” आणि आता त्याच नौशाद यांची दोन्ही मुलं क्रिकेटर आहेत. सर्फराज आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळला. त्याचबरोबर मुशीरची रणजी संघात निवड झाली आहे. सर्फराजने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “मी माझा भाऊ मुशीरसाठी मुंबईहून अतिरिक्त कॅपसाठी मॅनेजरला विनंती केली होती. देवाने कृपा केली आहे. ही मुशीर आणि माझ्या वडिलांची मेहनत आहे. आम्हाला क्रिकेटपटू बनवण्यासाठी वडिलांनी खूप त्याग केला आहे.” राष्ट्रीय क्रिकेट अकादमी झोनल कॅम्पसाठी निवड झाल्यानंतर मुशीर सध्या सुरतमध्ये ट्रेनिंग घेत आहे. मुशीर म्हणाला, ‘माझ्या वडिलांनी मला जे करायला सांगितलं तेच मी केलं. माझा भाऊ सर्फराज खान आणि माझे एकच स्वप्न आहे ते म्हणजे भारतीय टीममधून खेळणं आणि माझ्या वडिलांना आनंद देणं. माझी निवड झाल्याच्या बातमीने मला खूप आनंद झाला आहे आणि मी निवड समिती सदस्य आणि एमसीएचा आभारी आहे. मला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि अजून खूप काही करायचंय.” Ranji Trophy : 'नॉक आऊट' राऊंडपूर्वी मुंबईला धक्का, IPL गाजवणारा खेळाडू स्पर्धेतून बाहेर मुशीरच्या क्रिकेटपटू होण्याच्या प्रवासाबद्दल त्याचे वडील नौशाद म्हणाले, "हे सर्व तेव्हा सुरू झालं, जेव्हा त्याच्या त्याला वयाच्या 15 व्या वर्षी वरिष्ठ खेळाडूंविरुद्ध ओपनर म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला होता. तिथून त्याचा आत्मविश्वास वाढला. सर्फराजसोबत सराव करताना ज्या चुका केल्या त्याच चुका मी मुशीरच्या बाबतीत टाळल्या. इथे सर्फराज संध्याकाळी नेटमध्ये प्रॅक्टिस करायचा. पण जेव्हा तो मुंबईसाठी खेळायला गेला तेव्हा सकाळी लाल बॉलने खेळावं लागायचं, सवय नसल्याने त्यावेळी त्याला खूप झगडावं लागलं. मला माझी चूक कळली. त्यामुळे आता आम्ही सकाळी पीचवर दव असताना प्रॅक्टिस करतो. त्यामुळे मुशीर वेगवान गोलंदाज समोर असले तरी आरामात खेळतो.’ सर्फराज आणि मुशीर यांना क्रिकेटपटू बनवण्यात त्यांचे वडील नौशाद यांचे महत्त्वाचे योगदान आहे. खेळाबद्दलची आवड जोपासण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. नौशाद यांनी एकदा 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना त्यांचं कुटुंब कठीण काळात कसं जगलं, याबद्दल सांगितलं होतं. ते म्हणाले होते, “आम्ही झोपडपट्टीत राहायचो, शौचालयासाठी रांगेत उभे राहायचो, तिथे माझ्या मुलांना थोबाडीत मारून रांगेत मागे ढकलंलं जायचं. आमच्याकडे काहीही नव्हतं.” निवड समितीवर सुरेश रैना नाराज, कार्तिकचं नाव घेत साधला निशाणा नौशाद यांनी केलेल्या कष्टाचं आणि संघर्षाचं आज खऱ्या अर्थानी चीज झालंय असं म्हणता येईल. त्यांची दोन्ही मुलं सर्फराज आणि मुशीर व्यावसायिक क्रिकेट खेळू लागली आहेत. घरची परिस्थिती सुधारली असून, मुलांनी वडिलांचं नाव उज्ज्वल केलंय. मुंबईची रणजी टीम : पृथ्वी शॉ (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, भूपेन लालवाणी, अरमान जाफर, सर्फराज खान, सुवेद पारकर, आकर्षित गोमेल, आदित्य तारे, हार्दिक तमोर, अमन खान, साईराज पाटील, शम्स मुलाणी, ध्रुमिल मटकर, तनुष कोटियन, शशांक अटर्डे, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, रोयस्तान डायस, सिद्धार्थ राऊत आणि मुशीर खान.
    First published:

    Tags: Cricket news, Mumbai, Ranjit campionship

    पुढील बातम्या