मुंबई, 24 एप्रिल : 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आज 49 वर्षांचा झाला आहे. आजच्याच दिवशी 24 एप्रिल 1973 रोजी सचिनचा मुंबईत जन्म झाला. सचिननं 24 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजे त्याच्या वाढदिवशी धमाल केली होती. सचिनच्या वादळी बॅटींगचा तडाखा शेन वॉर्नसह (Shane Warne) संपूर्ण ऑस्ट्रेलियन टीमला बसला. वॉर्न तर आयुष्यभर सचिनची ती खेळी विसरू शकला नाही.
24 एप्रिल 1998 रोजी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात कोका-कोला कप स्पर्धेची फायनल झाली. या फायनलमध्ये सचिननं 131 बॉलमध्ये 134 रन केले. त्याच्या खेळीमुळे भारताने 6 विकेट्सनं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत कोका-कोला कप जिंकला. त्या मॅचमध्ये वॉर्ननं 10 ओव्हर्समध्ये 61 रन दिले होते.
ऑस्ट्रेलियानं फायनल जिंकण्यसाठी टीम इंडियाला 272 रनचं आव्हान दिलं होतं. भारतीय टीमनं हे आव्हान 48. 3 ओव्हर्समध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. ओपनर सौरव गांगुली लवकर आऊट झाल्यानं टीम इंडिया अडचणीत आली होती. त्यावेळी सचिननं भारतीय फॅन्सचा विश्वास सार्थ ठरवत ऑस्ट्रेलियन बॉलर्सची जोरदार धुलाई केली. या इनिंगमधील सचिनचा प्रत्येक फटका ऑस्ट्रेलियन खेळाडूंना चांगलाच लक्षात आहे. सचिन हा एकमेव क्रिकेटर आहे, ज्याला ऑस्ट्रेलियन टीम नेहमी लक्षात ठेवेल अशी प्रतिक्रिया साक्षात डॉन ब्रॅडमननं दिली होती.
1998 ठरले यशस्वी
सचिनसाठी 1998 हे वर्ष चांगलंच यशस्वी ठरलं. त्यानं त्या एका वर्षात 12 शतक झळकावली. हा एक रेकॉर्ड आहे. विराट कोहली दोनदा या रेकॉर्डच्या जवळ आला होता, पण त्याला तो मोडता आला नाही. विराटनं 2017 आणि 2018 साली 11-11 शतकं झळकावली होती. पण, त्याला सचिनला मागे टाकता आलं नाही. रिकी पॉन्टिंगनंही 2003 साली 11 शतक झळकावली होती.
IPL 2022: प्रविण आमरेंना मैदानात जाण्याची इच्छा नव्हती, पण... वाचा तेंव्हा नेमकं काय घडलं
सचिननं 200 टेस्ट, 463 वन-डे आणि एक टी20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. त्यामध्ये त्यानं 34 हजारांपेक्षा जास्त रन केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 पेक्षा जास्त शतक झळकावणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. तसंच सर्वात जास्त रन आणि सर्वात जास्त टेस्ट मॅच खेळण्याचा रेकॉर्डही सचिनच्या नावावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, On this Day, Sachin tendulkar