एकटा टायगर सेहवाग विंडिज लिजंड्सवर पडला भारी, इंडिया लिजंड्सचा विजय

एकटा टायगर सेहवाग विंडिज लिजंड्सवर पडला भारी, इंडिया लिजंड्सचा विजय

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लिजंड्सने विंडीज लिजंड्सवर 7 गडी राखून पराभूत केलं. विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्या खेळीच्या जोरावर इंडिया लिजंड्सने विजय मिळवला.

  • Share this:

मुंबई, 07 मार्च : रस्ता सुरक्षेसाठी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. यामध्ये पहिला सामना इंडिया लिजंड विरुद्ध वेस्ट इंडिज लिजंड यांच्यात झाला. विरेंद्र सेहवागच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंडिया लिजंड्सने विंडिजवर 7 गडी राखून विजय मिळवला. विंडिजने दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना इंडिया लिजंड्सच्या सचिन आणि सेहवाग या सलामीच्या जोडीने 83 धावांची भागिदारी केली. त्यानंतर सेहवागने एका बाजुने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्यासोबत मोहम्मद कैफने 14 तर युवराज सिंगने नाबाद 10 धावा काढला.

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 29 चेंडूत 36 धावा केल्या. विंडीजच्या सुलेमन बेनच्या गोलंदाजीवर सचिनचा झेल जेकॉब्सने घेतला. सचिन बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 10.2 षटकांत 83 झाली होती. त्यानंतर भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं. विरेंद्र सेहवागने 11 चौकारांसह 57 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून इंडिया लिजंडने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरलेल्या विंडिज लिजंडने शिवनारायन चंदरपॉलच्या अर्धशतकी आणि डॅरेन गंगाच्या फटकेबाजीच्या जोरावर 20 षटकात 8 बाद 150 धावा केल्या. चंदरपॉलने 41 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. तर डॅरेन गंगाने 24 चेंडूत 32 धावांची वेगवान खेळी केली. यांच्या व्यतिरिक्त ब्रायन लारा 17 धावा, डॅन्झा हॅट 12 धावा तर टिनो बेस्ट 11 धावांवर बाद झाले. इतर खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

भारताकडून गोलंदाजी करताना जहीर खान, मुनाफ पटेल आणि प्रज्ञान ओझा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर इरफान पठाणने एक गडी बाद केला. जहीर खानने सलामीवीर डॅरेन गंगाला बाद करून विंडीजला पहिला दणका दिला. मुनाफ पटेलनं शिवनारायण चंदरपॉलला बाद करून शेवटच्या षटकांत विंडिजच्या धावांची गती कमी केली.

हे वाचा : धोनीचं ठरलंय! माजी निवड समिती प्रमुखांनी माहीच्या निवृत्तीबद्दल केला खुलासा

First published: March 7, 2020, 10:48 PM IST

ताज्या बातम्या