मुंबई, 28 डिसेंबर : भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा गुजरातमधील राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ती जामनगर उत्तर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आली आहे. रिवाबाच्या प्रचारापासून जडेजा सातत्यानं वादात सापडत आहे. भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालून प्रचार रॅलीत भाग घेतल्यानं जडेजावर टीका झाली होती. आता पुन्हा एकदा तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. जडेजानं पत्नी रिवाबाच्या आरएसएसबद्दलच्या ज्ञानाची प्रशंसा केल्याबद्दल त्याला ट्रोल केलं जात आहे. रिवाबाचा एक व्हिडिओ त्यानं पोस्ट केला आहे. त्यानंतर त्यानं राष्ट्रीय ध्वजासह 'इंडियन' असं कॅप्शन दिलेला स्वतःचाही एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे तो नेटिझन्सच्या तावडीत सापडला आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
26 डिसेंबर रोजी जडेजानं पत्नी रिवाबाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. "आरएसएसबद्दल तुझं ज्ञान पाहून खूप छान वाटलं. आरएसएस ही भारतीय संस्कृती आणि आपल्या समाजाच्या मूल्यांचे पालन करण्याच्या आदर्शांना प्रोत्साहन देणारी संस्था आहे. तुझं ज्ञान आणि कठोर परिश्रम तुला इतरांपेक्षा वेगळं बनवतात. अशीच प्रगती सुरू ठेव," असं कॅप्शन देऊन जडेजानं हा व्हिडिओ शेअर केला आहे.
It's so good to see your knowledge about the RSS. An organisation which promotes the ideals of upholding Indian culture and the values of our society. Your knowledge and hardwork is what sets you apart. Keep it up. 👏 @Rivaba4BJP pic.twitter.com/Ss5WKTDrWK
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) December 26, 2022
2022 गुजरात विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच आमदार झालेल्या रिवाबाला एका कार्यक्रमामध्ये आरएसएसबद्दल बोलण्यास सांगितलं होतं. त्यावेळी ती म्हणाल होती की, देशभक्ती, राष्ट्रवाद, त्याग आणि एकात्मता या सगळ्या मूल्यांना धरून चालणारी संघटना आणि भाजपची मातृ संघटना म्हणजे आरएसएस. हाच व्हिडिओ रवींद्र जडेजानं शेअर केला आहे.
सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडिओवरून जडेजाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. "तू राजकारणात प्रवेश केला आहेस की बीसीसीआयनं भाजप आणि आरएसएससमोर गुडघे टेकले आहेत? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला आहेत.
विराट-रोहित-पंतला धक्का, श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा
काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत सांगितलं की, ईडी आणि आयकर विभागाच्या भीतीमुळे खेळाडू, अभिनेते असे अनेकजण भाजपला खूश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी जडेजाचा भूमिकेचा बचाव केला आहे. आपल्या पत्नीला पाठिंबा देऊन आणि कौतुक करून त्यानं चूक केली का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. "आरएसएस समाजातील मूल्यं जपते या गोष्टीचं त्या पती-पत्नीनी समर्थन केलं. भारतीय संस्कृती आणि मूल्य व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारी ही संघटना आहे. हे बघून आता संपूर्ण तथाकथित उदारमतवादी लुटियन्स सेक्युलर इको-सिस्टमचा इतका संताप झाला आहे. काँग्रेस पक्षाचे रशीद अल्वी यांनी राष्ट्रीय चॅनेलवर जडेजावर टीका केली. आरएसएसबद्दल बोलणं गुन्हा आहे का?" असं पूनावाला म्हणाले.
Ranji : गोलंदाजाने पाच चेंडूत घेतल्या 4 विकेट, विराटशी आहे खास कनेक्शन
"प्रणव मुखर्जींसह अनेक काँग्रेस नेत्यांनी आरएसएसचं कौतुक केलेलं आहे. अनेक क्रिकेटपटूंनी उघडपणे काँग्रेसलाही पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचा आरएसएसबद्दलचा हा द्वेष आता जडेजाविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य करण्यापर्यंत पोहोचला आहे. कोणी काँग्रेसची स्तुती केली तर ते चालतं. पण, जर कोणी आरएसएसची स्तुती केली तर त्यांना टारगेट केलं जातं," याची आठवण पूनावाला यांनी करुन दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ravindra jadeja, RSS, Social media