मुंबई, 16 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट टीमला (Team India) यावर्षी नवे मुख्य प्रशिक्षक मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे. टीम इंडियाचे विद्यमान कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मुदतवाढीचा बीसीसीआयचा प्रस्ताव फेटाळला आहे. शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कालावधी नोव्हेंबर महिन्यात टी 20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. त्यानंतर त्यांचा करार वाढवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयनं दिला होता.
भारतीय टीम टी20 वर्ल्ड कपनंतर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाला आजवर दक्षिण आफ्रिकेत एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. शास्त्री यांच्या मार्गदर्शाखाली भारतीय टीमनं ऑस्ट्रेलियात दोन वेळा टेस्ट सीरिज जिंकली आहे. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये नुकतीच झालेली टेस्ट सीरिज स्थगित होण्यापूर्वी भारतीय टीम 2-1 नं आघाडीवर होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या महत्त्वाच्या दौऱ्यातही शास्त्री यांनीच हेड कोच म्हणून काम पाहावं अशी विनंती बीसीसीआयनं केली होती. त्याला शास्त्रींनी नकार दिला आहे. 'इनसाईड स्पोर्ट्स'नं हे वृत्त दिलं आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय टीम 3 टेस्ट, 3 वन-डे आणि 4 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 17 डिसेंबरपासून या दौऱ्यातील पहिली टेस्ट सुरु होणार आहे. तर शेवटची टी 20 लढत ही 26 जानेवारीला होईल.
IPL 2021: राजस्थानच्या अडचणीत भर, जबरदस्त फॉर्मातील 'सिक्सर किंग' जखमी
शास्त्री 2014 ते 2016 मधील टी20 वर्ल्ड कपपर्यंत टीम इंडियाचे संचालक होते. त्यानंतर अनिल कुंबळे एक वर्ष मुख्य प्रशिक्षक होते. 2017 साली कुंबळेला दूर करत पुन्हा एकदा रवी शास्त्रीची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता त्यांनी मुदतवाढ स्वीकारण्यास नकार दिल्यानं यावर्षी टीम इंडियाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार हे नक्की झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Ravi shashtri