मुंबई, 7 जून : रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या क्वार्टफायनलमध्ये (Ranji Trophy quarterfinal) मुंबईचा सामना उत्तराखंडशी (Mumbai vs Uttarakhand) होत आहे. या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईची स्थिती भक्कम झाली आहे. मुंबईनं पहिल्या इनिंगमध्ये 500 रनचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईच्या या मोठ्या धावसंख्येत दोन बॅटर्सचं मुख्य योगदान आहे. सर्फराज खाननं (Sarfaraz Khan) या सिझनमधील तिसरं शतक झळकावलं. सर्फराजनं 205 बॉलमध्ये 153 रनची खेळी केली. पण, मुंबईच्या या इनिंगचा खरा हिरो सुवेद पारकर (Suved Parkar) ठरला.
मुंबईचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) दुखापत झाल्यानं सुवेदला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. सुवेदनं या संधीचं सोनं करत फर्स्ट क्लास कारकिर्दीमधील पदार्पणातच द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. मुंबईकडून ही कामगिरी करणारा सुवेद दुसरा क्रिकेटपटू आहे. यापूर्वी पराक्रम अमोल मजूमदार (Amol Muzumdar) यानं हा पराक्रम केला होता. त्यानं 28 वर्षांपूर्वी म्हणजे 1994 साली हरयाणा विरूद्धच्या पदार्पणातील सामन्यात 206 रन केले होते.
विशेष म्हणजे अमोल सध्या मुंबई क्रिकेट टीमचा कोच आहे. त्याच्या मार्गदर्शनाखालीच सुवेदनं या विक्रमाची बरोबरी केली आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पदार्पणातील सामन्यात सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्ड बिहारच्या सकिबूल गनी याच्या नावावर आहे. त्यानं रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या याच सिझनमध्ये मिझोराम विरूद्ध 341 रन काढले होते.
Ranji Trophy : मुंबईकर सर्फराजचं पुन्हा वादळ, रोहित-राहुल कधी घेणार दखल?
सुवेदनं उत्तराखंड विरूद्ध सुरू असलेल्या क्वार्टर फायनलच्या दुसऱ्या दिवशी स्वप्नील सिंहचा बॉल लाँग ऑफला खेळत द्विशतक पूर्ण केले. त्यानं 375 बॉलमध्ये हा टप्पा ओलांडला. सुवेदनं या खेळीत 17 फोर आणि 3 सिक्स लगावले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पणातच द्विशतक झळकावणारा सुवेद हा 12 वा भारतीय आहे. तर या सिझनमधील तिसरा क्रिकेटपटू आहे. यापूर्वी सकिबून गनी (341) आणि महाराष्ट्राच्या पवन शहा (219) यांनी ही कामगिरी केली आहे.
दिनेश लाड यांचा शिष्य
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) घडवणाऱ्या दिनेश लाड यांचा सुवेदही शिष्य आहे. तो देखील रोहित प्रमाणे बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे. तो 2019-20 मध्ये टीम इंडियाच्या अंडर 19 टीमचा सदस्य होता. मागच्या महिन्यात मुंबईला सीके नायडू करंडक जिंकून देण्यात त्याचे मोलाचे योगदान होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.