मुंबई, 23 जून: कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेला आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. या सिझनमधील 60 पैकी 31 सामने अजून बाकी आहेत. उर्वरित सामन्यामध्ये दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे आयपीएल टीमची डोकेदुखी वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेक दिग्गज खेळाडू उर्वरित सामने खेळणार नाहीत. राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) दिग्गज क्रिकेटपटूनं उर्वरित स्पर्धेतून माघार घेण्याची घोषणा करत टीमला धक्का दिला आहे.
राजस्थान रॉयल्सच्या बॅटींगचा प्रमुख आधार असलेला आक्रमक बॅट्समन जोस बटलर (Jos Buttler) याने उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आहे. ‘द टेलीग्राफ’ बरोबर बोलताना बटलरने सांगितले की, “आयपीएल स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यांच्या तारखा एक नसतात. जर दोन्ही स्पर्धा एकाच काळात असतील तर इंग्लंडकडून खेळण्याला प्राधान्य असेल. आयपीएलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूनं खेळावं की नाही याचा निर्णय ईसीबीचे क्रिकेट संचालक एश्ले जाईल्स (Ashley Giles) यांनी घ्यावा,” असं बटलरनं सांगितलं आहे.
“जाईल्स सांगतील त्या ठिकाणी आम्ही खेळू. मला जास्तीत जास्त क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. पण तुम्ही सर्व गोष्टींसाठी एकाच वेळी उपलब्ध राहू शकत नाही. या प्रश्नाला काही उत्तर नाही. आम्ही खूप क्रिकेट खेळलो आहे, यापुढे देखील खेळणार आहोत.” असे त्याने स्पष्ट केले.
जाईल्स काय म्हणाले होते?
इंग्लंडचा कोणताही क्रिकेटपटू उर्वरित आयपीएल सामन्यांमध्ये खेळणार नाही, असे जाईल्स यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. "आम्ही आमच्या खेळाडूंना आराम देऊ पण आयपीएल खेळण्याची परवानगी देणार नाही. आमचा कार्यक्रम निश्चित आहे. आमचे सर्वोत्तम खेळाडू टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) आणि अॅशेस सीरिजसाठी फिट असावेत, अशी बोर्डाची इच्छा आहे."
आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. त्या काळात इंग्लंडची टीम बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध मालिका खेळणार आहे. इंग्लंड बोर्ड आगामी टी 20 वर्ल्ड कपचा विचार करत काही खेळाडूंना या दरम्यान विश्रांती देण्याची शक्यता आहे.
इंग्लंडमध्ये जिवंत राहिलो नसतो, वेस्ट इंडिजच्या दिग्गज क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा!
राजस्थानच्या अडचणीत भर
कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी जोस बटलर फॉर्मात होता. राजस्थान रॉयल्सच्या शेवटच्या सामन्यात त्याने शतक झळकावले होते. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात बटलरने 64 बॉलमध्ये 124 रनची आक्रमक खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सनं हैदराबादचा 55 रनने पराभव केला होता. आता बटलरनं उर्वरित स्पर्धेतून माघार घेतल्यानं राजस्थानच्या अडचणीत मोठी भर पडणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, England, IPL 2021, Rajasthan Royals