मुंबई, 3 जून : टीम इंडियानं 2020-21 मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत विजय मिळवला होता. भारतीय टीमसाठी तो ऐतिहासिक विजय होता. अॅडलेड टेस्टमध्ये झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय टीमनं त्या मालिकेत पुनरागमन केलं आणि विजय मिळवला. टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) या ऐतिहासिक मालिका विजयाचा एक हिरो होता. त्यानं मालिकेत चांगली बॉलिंग केलीच. त्याचबरोबर सिडनी टेस्टमध्ये हनुमा विहारीसोबत चिवट भागिदारी करत टीमचा पराभव टाळला. सिडनी टेस्ट ड्रॉ करण्यात अश्विनचं असलेलं योगदान कुणीही विसरू शकत नाही.
अश्विन आणि विहारी हे दोघंही सिडनी टेस्टच्या वेळी दुखापतग्रस्त होते. त्यानंतरही ते मैदानात उभे राहिले. त्यांनी 259 बॉलमध्ये 62 रनची नाबाद भागिदारी करत ती टेस्ट ड्रॉ केली. भारतीय टीमच्या या ऐतिहासिक विजयावर एक वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. त्या सीरिजच्या निमित्तानं अश्विननं सिडनी टेस्टची गोष्ट सांगितली आहे.
मैदानात काय झालं?
अश्विननं यावेळी सांगितलं, 'आम्ही खेळण्यासाठी पिचवर उतरलो तेव्हाच आम्हाला त्रास जाणवला. तो (हनुमा) पुढं येऊ शकत नव्हता. त्यामुळे बॅकफुटवर बॅटींग करत होता. त्याचा स्नायू दुखावला होता. मी फास्ट बॉलर्सच्या विरूद्ध पुढे येऊन खेळू शकत नव्हतो. त्यावेळी मी हनुमाला स्ट्राईक रोटेट करत खेळू असं सांगितलं.
तो कधी-कधी फास्ट बॉलर्सचा सामना करत होता तर मी स्पिनर्सला खेळत होतो. आम्ही या पद्धतीनं काही ओव्हर बॅटींग केली. आम्ही एकमेकांची मदत करत होतो. ' अशी आठवण अश्विननं सांगितली.
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या धोकादायक त्रिकुटापासून टीम इंडियाला राहावे लागेल सावध
बायको आणि मुलीनं उठवलं
सिडनी टेस्टमधील पाठदुखीमुळे अश्विन गाबा टेस्ट खेळू शकला नाही. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, 'सिडनी टेस्टच्या दरम्यान माझी अवस्था खराब होती. मी पेन किलर घेऊन बॉलिंग करायला गेलो होतो. मी 13 -14 ओव्हर्स बॉलिंग केली. मला असह्य त्रास होत होता. मी या त्रासामुळे फरशीवर पडत होतो. मला बायको आणि मुलीनं उठवलं. त्यांनंतर फिजियोनं मला तपासलं. मी त्यापरिस्थितीमध्येही मैदानात उतरलो आणि सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.