नवी दिल्ली, 13 मार्च : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुनरागमन करणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पुढच्या दोन सामन्यात पांड्याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पांड्या क्रिकेटपासून दूर आहे. टीम इंडियात पुनरागमनाआधी डीवाय पाटील टी20 स्पर्धेत तुफान फटकेबाजी केली. याशिवाय गोलंदाजीतही कमाल केली. या कामगिरीबद्दल पांड्याने चहल टीव्हीवर खुलासा केला. पांड्याने डीवाय पाटील टी20 स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात 55 चेंडूत 158 धावा केल्या होत्या. या कामगिरीबद्दल बोलताना पांड्या म्हणाला की, ‘बऱ्याच काळानंतर मैदानावर उतरलो होतो. मला माहिती होतं की जेवढं खेळेन तेवढा आत्मविश्वास वाढेल. 10 षटकार मारल्यानंतर मला वाटलं की 10 षटकार मारलेत तर का थांबायचं. पण मी कधीच विचार केला नव्हता की एका डावात 20 षटकार मारेन.’ टीम इंडियात पुनरागमनाबद्दल सांगितलं की, ‘गेल्या सहा महिन्यांपासून टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमचं वातावरण, जर्सी मिस केली. जर्सी घालून देशासाठी खेळणं मिस केलं.’ हे वाचा : टीम इंडियाला 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश नाही, क्विलिफायर खेळून एन्ट्री? ‘‘सहा महिने क्रिकेटपासून दूर असल्यानं मानसिक दबाव होता. पुनरागमनासाठी तयारी केली असली तरी ते सोपं नव्हतं. पूर्णपणे तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करत होतो. पण बऱ्याचदा ते कठीण वाटत होतं. आता सर्व ठीक आहे. त्यावेळी मला अनेकांनी मदत केली’’, असं पांड्याने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







