मुंबई, 8 ऑक्टोबर: पाकिस्तान क्रिकेट हे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या (BCCI) मदतीवर अवलंबून आहे, अशी कबुली पीसीबीचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी दिली आहे. बीसीसीआयनं ही मदत बंद केली तर पाकिस्तान बोर्डाचं दिवाळं वाजेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सक्षम करणे ही आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. इस्लामाबादमधील अंतर्गत प्रकरणांच्या सिनेटसमोर बोलताना राजा यावेळी म्हणाले की, पीसीबीच्या बजेटचा 50 टक्के भाग हा आयसीसीकडून (ICC) मिळणाऱ्या अनुदानातून पूर्ण होतो. तर आयसीसीला सर्वात जास्त पैसा हा बीसीसीआयकडून येतो. पीसीबीनं आयसीसीवर अवलंबून राहणे कमी केले पाहिजे तसंच स्वत:ची गरज स्थानिक बाजारपेठेतून पूर्ण करणे आवश्यक आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. पीसीबी प्रमुखांनी पुढे सांगितलं की, ‘आयसीसीचं राजकीयकरण झालं आहे. ही संघटना आशियाई आणि पाश्चिमात्य देशांच्या गटामध्ये विभागली गेली आहे. आयसीसीचा 90 टक्के महसूल हा भारतामधून येतो. पीसीबीचा 50 टक्के कारभार हा आयसीसीच्या मदतीवर चालतो. भारतानं आयसीसीला मदत करणे बंद केले तर पीसीबी संपूर्ण नष्ट होईल. पीसीबीकडून आयसीसीला एकही पैसा दिला जात नाही. मी पीसीबीला मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे. T20 World Cup आधी पाकिस्तानने ‘कट’ केलं भारताचं नाव, वादाची ठिणगी पेटणार! आयसीसी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी झाली आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडनं पाकिस्तानातील सीरिज रद्द केली. या प्रकारच्या घटना भविष्यात होऊ द्यायच्या नसतील तर पीसीबीला आपलं मत मांडलं पाहिजे. न्यूझीलंडनं जे केलं ते अस्विकार्य होते. त्यांनी आजपर्यंत दौरा का रद्द केला? याची माहिती आम्हाला कळवलेली नाही. मात्र, आता ते पुन्हा एकदा पाकिस्तान दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आठवडाभरात याबाबतची चांगली बातमी समजू शकते,’ असे संकेत राजा यांनी दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.