मुंबई, 2 एप्रिल : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 2 एप्रिल हा दिवस खास आहे. आजच्या दिवशी 2011 साली (On This Day ) भारताने दुसऱ्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. कपिल देवच्या टीमनं 1983 साली केलेल्या कामगिरीनंतर तब्बल 28 वर्षांनी भारतीय कॅप्टननं वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाचा तेंव्हाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याने सिक्स लगावत भारताच्या वर्ल्ड कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. धोनीचा तो अजरामर सिक्स, त्यानंतरच्या मिरवणुकीच्या दरम्यान सचिन तेंडुलकरचे अश्रू आणि संपूर्ण देशानं केलेला जल्लोष आज 10 वर्षांनी देखील सर्वांच्या लक्षात आहे.
दोन यजमान टीममधील फायनल
भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) या 2011 च्या वर्ल्ड कपच्या दोन यजमान टीममध्ये वर्ल्ड कपची फायनल झाली होती. या मॅचची सुरुवात भारतासाठी चांगली झाली नाही. श्रीलंकेचा कॅप्टन कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याने टॉस जिंकला. संगकराने टॉस जिंकताच पहिल्यांदा बॅटींग घेण्यास क्षणाचाही उशीर केला नाही.
झहीर खानच्या अचूक स्पेलनं श्रीलंकेची सुरुवात संथ झाली. त्यांचे दोन्ही ओपनर 10 ओव्हरमध्ये आऊट झाले. त्यानंतर कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी श्रीलंकेची इनिंग सावरली. संगकारा आऊट झाला. पण जयवर्धने खेळत होता. श्रीलंकेच्या अनुभवी बॅट्समननं त्याचं संपूर्ण कौशल्य पणाला लावलं. शेवटच्या ओव्हर्समध्ये त्याने वेग वाढवला आणि शतक झळकावले. जयवर्धनेच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेनं भारतासमोर विजयासाठी 275 रनचं आव्हान ठेवलं.
भारताची खराब सुरुवात
वर्ल्ड कप फायनलचा विचार करता 275 हे आव्हानात्मक लक्ष्य होते. भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) शून्यावर आऊट झाला. त्यापाठोपाठ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) 18 रनवर आऊट झाला. सचिन आऊट होताच वानखेडे स्टेडियमवर नाही तर फायनल मॅच पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या घरात काही काळ शांतता पसरली होती.
या अवघड परिस्थितीमध्ये गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) ही दिल्लीकर जोडी जमली. या दोघांनी रनरेट वाढणार नाही याची काळजी घेत धावफलक हलता ठेवला. अखेर दिलशाननं एक सुंदर कॅच घेत कोहलीला आऊट केलं.
धोनीची आश्चर्यकारक चाल
विराट कोहली आऊट झाल्यानंतर बॅटींग ऑर्डर प्रमाणे युवराज सिंह (Yuvraj Singh) येणे अपेक्षित होते. युवराज संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये फॉर्मात होता. पण महेंद्रसिंह धोनीनं स्वत:ला बढती देण्याचा निर्णय घेतला. धोनीची ती चाल कमालीची यशस्वी झाली. महेंद्रसिंह धोनीनं त्याच्या क्रिकेट करियरमधील सर्वोत्तम खेळ त्या दिवशी केला.
( On This Day : वर्ल्ड कपमधील प्रतिष्ठेच्या लढतीत भारताकडून पाकिस्तानचा पत्ता कट )
गौतम गंभीरचं शतक फक्त 3 रननं हुकलं. पण धोनी थांबला नाही. तो सहज पद्धतीनं खेळत होता. त्यानं श्रीलंकेच्या सर्व बॉलर्सचा समाचार घेतला. युवराज सिंहसोबत वेगाने रन जमवले. त्यानंतर अखेर तो क्षण आला...49 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर धोनीनं कुलसेखराला सिक्स मारत भारताच्या वर्ल्ड कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
धोनीच्या त्या सिक्सनंतर त्या रात्री संपूर्ण देशात दिवाळी साजरी झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, MS Dhoni, On this Day