मुंबई, 6 मार्च : क्रिकेटमधील अनेक विक्रम आजवर तुटले आहेत. मात्र एक रेकॉर्ड असा आहे की जो गेल्या 56 वर्षांपासून कायम आहे. त्या विक्रमाची बरोबरी करणं देखील अजून कुणाला जमलेलं नाही. पहिल्याच टेस्टमध्ये शतक करणारे अनेक बॅट्समन आहेत. पहिल्या टेस्टमध्ये पाच विकेट्स घेणारे अनेक बॉलर आहेत. मात्र पहिल्याच टेस्टमध्ये शतक आणि पाच विकेट्स घेण्याचा विक्रम करणाऱ्या एकमेव ऑल राऊंडरचं शनिवारी सकाळी निधन झालं. न्यूझीलंडचे ऑल राऊंडर ब्रुस टेलर (Bruce Taylor) असं या ऑलराऊंडरचं नाव आहे. ते 77 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून टेलर आजारी होते. यामध्येच त्यांचं निधन झालं. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानंही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. टेलर यांनी 1965 ते 1973 या काळात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं. या आठ वर्षांमध्ये त्यांनी 30 टेस्ट आणि 2 वन-डे मॅच खेळल्या. या आठ वर्षांच्या टेस्टकारकीर्दीमध्ये त्यांनी 20.04 च्या सरासरीनं 998 रन केले. यामध्ये दोन शतक आणि दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याचबरोबर त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 111 विकेट्सही घेतल्या. एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची किमया त्यांनी पाच वेळा केली.
NZC is deeply saddened to learn of the passing of NZ all-rounder, Bruce Taylor, aged 77. In his 30 Tests, Bruce was a force of nature & remains the only player in the world to have scored a century & taken a five-for on Test debut. Our thoughts are with his family & close friends
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 6, 2021
भारताविरुद्ध केला होता विक्रम टेलर यांचं टेस्ट क्रिकेटमधील पदार्पण हे मोठं सनसनाटी ठरलं. कोलकातामध्ये 1965 साली भारताविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये त्यांनी पदार्पण केलं. त्या मॅचमध्ये त्यांनी आठव्या क्रमांकावर येत फक्त 158 मिनिटांमध्ये 14 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 105 रन काढले होते. त्यानंतर त्यांनी एकाच डावात पाच विकेट्सही घेतल्या. पदार्पणातील टेस्टमध्ये शतक आणि नंतर एका डावात पाच विकेट हा त्यांचा विक्रम आजही अबाधित आहे.