रांची, 14 ऑगस्ट : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. धोनी सध्या फक्त आयपीएल स्पर्धेत खेळतो. इतर वेळी तो प्रसिद्धीपासून दूर असतो. रांचीमधील फार्म हाऊसमध्ये आपला बहुतेक वेळ घालवणाऱ्या धोनीची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. त्याला भेटण्यासाठी एका फॅननं चक्क हरयणातून रांचीपर्यंत 1436 किलोमीटर पायी प्रवास केला आहे.
अजय गिल (MS Dhoni Fan Ajay Gill) असं या धोनीच्या फॅनचं नाव असून तो हरयाणातील हिसारमधून रांचीला चालत आला आहे. हातामध्ये तिरंगा घेऊन तो सध्या धोनीच्या घराबाहेर उभा आहे. धोनीची भेट मिळत नाही तोपर्यंत रांचीतून जाणार नाही, असं त्यानं जाहीर केलं आहे.
धोनी स्वप्नात आला!
हातामध्ये बॅट आणि तिरंगा झेंडा घेऊन आपण हिसारमधून पायी निघालो असल्याचा दावा अजयनं केला आहे. अजय पायी का आला याचं कारण देखील अजब आहे. तो महेंद्रसिंह धोनीला देव मानतो. त्याच्या देवानं म्हणजेच धोनीनं त्याला स्वप्नात दर्शन दिलं आणि रांचीला येण्याचं आमंत्रण दिलं, असा त्याचा दावा आहे. धोनीचं घर हे तीर्थक्षेत्र असल्यानं आपण चालतच इथं येण्याचं ठरवलं असं अजय सांगतो. आता धोनीनं त्याला भेटून त्याच्याकडील बॅटवर स्वाक्षरी द्यावी अशी अजयची इच्छा आहे.
अजयनं दिलेल्या माहितीनुसार तो 12 वी पास आहे. तसंच गावात न्हावीचं काम करतो. आपण यापूर्वी क्रिकेट खेळत होतो, पण धोनी निवृत्त झाल्यानंतर क्रिकेट खेळणे सोडले. आता धोनीच्या आशिर्वादानं पुन्हा एका क्रिकेट खेळण्यास सुरुवात करणार असून यामध्येच आपल्याला करिअर करायचं आहे, असं त्यांनं सांगितलं.
IND vs ENG : लॉर्ड्स टेस्टमध्ये ऋषभ पंतची कमाल, मोडला महेंद्रसिंह धोनीचा खास रेकॉर्ड
अजयला करावी लागणार प्रतीक्षा
अजय धोनीला भेटण्यासाठी रांचीमध्ये दाखल झाला असला तरी धोनी सध्या रांचीमध्ये नाही. तो पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी शुक्रवारीच दुबईमध्ये दाखल झाला आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यातच धोनी परत येणार आहे. त्यामुळे अजयला धोनीची भेट घेण्यासाठी किमान दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, MS Dhoni