मुंबई, 17 सप्टेंबर : विराट कोहलीनं टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याची घोषणा केली आहे. तो आगामी टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) कॅप्टनसी सोडणार आहे. विराटचा उत्तराधिकारी म्हणून सध्याचा व्हाईस कॅप्टन रोहित शर्माचं नाव (Rohit Sharma) सर्वात आघाडीवर आहे. रोहितचा कॅप्टन म्हणून रेकॉर्डही चांगला आहे. पण, टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भविष्याचा विचार करुन कॅप्टनची निवड करण्याचा सल्ला निवड समितीला दिला आहे. यावेळी गावसकर यांनी त्यांच्या पसंतीच्या खेळाडूचं नाव देखील सांगितलं आहे.
गावसकरांनी 'स्पोर्ट्स तक' शी बोलताना सांगितलं की, 'बीसीसीआय भविष्याचा विचार करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल विचार करणे आवश्यक आहे. भारत नव्या कॅप्टनला तयार करण्याचा विचार करत असेल तर त्यासाठी केएल राहुलचा (KL Rahul) विचार होऊ शकतो. त्यानं चांगली कामगिरी केली आहे. इतकंच नाही तर इंग्लंडमध्ये त्यानं चांगली बॅटींग केली आहे. तो आयपीएल, वन-डे क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करत आहे, त्याला कॅप्टन केले जाऊ शकते.'
राहुल आयपीएलमध्ये पंजाब किंग्स (Punjab Kings) टीमचा कॅप्टन आहे. त्यानं आयपीएलमध्येही चांगली कॅप्टनसी केली आहे. कॅप्टनसीचा प्रभाव त्याच्या बॅटींगवर पडलेला नाही, असंही गावसकरांनी यावेळी स्पष्ट केले.
रोहित शर्मा कॅप्टन झाल्यानंतर कोण होणार Vice Captain? 3 जणांमध्ये जोरदार चुरस
विराट कोहलीनं सोडली कॅप्टनसी
टीम इंडियाच्या टी20 टीमचा 2017 पासून कॅप्टन असलेल्या विराट कोहलीनं हे पद सोडत असल्याचं गुरुवारी जाहीर केलं. त्यानं ट्विटरवर तशी घोषणा केली आहे. "T20, वन डे आणि टेस्ट क्रिकेट या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये गेली 8-9 वर्षं सातत्याने खेळत आहे. त्यातली 5-6 वर्ष तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार म्हणूनही मी काम केलं. या वर्कलोडचा विचार करता मला स्वतःला थोडी स्पेस देण्याची गरज वाटते. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून ODI आणि टेस्ट क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करण्याच्या दृष्टीने मला स्वतःसाठी थोडा अवधी देण्याची गरज वाटते. म्हणूनच T20 World Cup संपल्यानंतर भारतीय T20 संघाचा कर्णधार म्हणून मी पायउतार होऊ इच्छितो', असं कोहलीने लिहिलं आहे. "T20 टीमचा फलंदाज म्हणून मी भविष्यात खेळत राहणार आहे", असंही त्याने स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Sunil gavaskar, Virat kohli