मुंबई, 5 जुलै: टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड
(Rahul Dravid) हा सध्या श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाचा हेड कोच आहे. विराट कोहलीच्या
(Virat Kohli) नेतृत्वाखालील मुख्य टीम सध्या इंग्लंडमध्ये आहे. रवी शास्त्री
(Ravi Shastri) या टीमचे हेड कोच आहेत. शिखर धवनच्या
(Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली टीमची जबाबदारी द्रविडनं स्विकारली आहे. ही जबाबदारी स्विकारल्यापासून तो भविष्यात रवी शास्त्रींची जागा घेणार अशी चर्चा सुरु झाली आहे. टीम इंडियाचे माजी कॅप्टन कपिल देव
(Kapil Dev) यांनी या विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
रवी शास्त्री यांचा कालावधी येत्या वर्षाच्या अखेरीस संपत आहे. या पदासाठी शास्त्रींचा उत्तराधिकारी म्हणून द्रविडचे नाव सर्वात आघाडीवर आहे.राहुल द्रविड यापूर्वी 2015 ते 2019 या कालावधीमध्ये भारत ए आणि अंडर-19 टीमचा कोच होता. तसेच तो सध्या बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा
(NCA) संचालक आहे. द्रविड आगामी काळात रवी शास्त्रीची जागा घेऊ शकतो, अशी क्रिकेट विश्वात चर्चा सुरू आहे.
कपिल देव यांनी 'एबीपी न्यूज' वरील कार्यक्रमात बोलताना सांगितले की, "माझ्या मते या विषयावर चर्चा करण्याची गरज नाही, श्रीलंका दौरा समाप्त होऊ दे. त्यानंतर टीमचं प्रदर्शन कसं झालं, हे आपल्याला माहिती होईल. तुम्ही नवा कोच तयार करत असाल तर यात काही चूक नाही. पण, रवी शास्त्री यांच्या नेतृत्त्वाखाली टीमनं चांगली कामगिरी सुरू ठेवली तर त्यांना पदावरून दूर करण्याची गरज नाही. याबाबत सर्व गोष्टी येत्या काळात स्पष्ट होतील. सध्या या प्रकारच्या चर्चेतून कोच आणि खेळाडूंवर अतिरिक्त दबाव वाढेल."
राशिद खाननं बॅटनं नाही तर गोल्फ स्टिकनं लगावला हेलिकॉप्टर शॉट, VIDEO पाहून व्हाल थक्क
भविष्यात दोन टीम तयार करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना कपिल देव म्हणाले की, " टीम इंडियाकडे मजबूत बेंच स्ट्रेंथ आहे. भारताच्या दोन्ही टीमनं इंग्लंड आणि श्रीलंकेत चांगली कामगिरी केली तर यापेक्षा चांगलं काही होऊच शकत नाही. तरूण खेळाडूंना संधी मिळत असेल तर यामध्ये चूक काहीच नाही. एकाच वेळी दोन टीमवर दबाव टाकायचा की नाही हे टीम मॅनेजमेंटवर अवलंबून आहे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.