मुंबई, 9 मार्च : आयपीएल स्पर्धेचं काऊंट डाऊन सुरू झालं आहे. यंदाच्या सिझनमध्ये (IPL 2022) एकूण 10 टीम खेळणार आहेत. चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) लढतीनं 26 मार्च रोजी स्पर्धेला सुरूवात होईल. स्पर्धेतील सर्व लीग मॅच मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन शहरांमध्ये होणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयपीएलच्या टीमना मोठा धक्का बसला आहे. 18 मार्चपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरूद्ध बांगलादेश (South Africa vs Bangladesh) सीरिजमुळे ही डोकेदुखी वाढली आहे. 3 वन-डे आणि 2 टेस्ट मॅचची ही सीरिज आहे. या सीरिजमुळे दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख 8 खेळाडू आयपीएलमध्ये पहिल्या दिवसापासून खेळणार नाहीत. कागिसो रबाडा (पंजाब किंग्ज), लुंगी एनगिडी ( दिल्ली कॅपिटल्स) आणि मार्को जेनसन (सनरायझर्स हैदराबाद) हे तीन प्रमुख खेळाडू टेस्ट सीरिज संपेपर्यंत आयपीएलमधून दूर राहण्याची शक्यता आहे. 12 एप्रिल रोजी ही सीरिज संपणार आहे. त्यामुळे हे खेळाडू 15 एप्रिलपर्यंत आयपीएल खेळू शकणार नाहीत. क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, एडन मार्करम, ड्वेन प्रिटोरियस, रस्सी व्हॅन डर डुसेन हे आफ्रिकन खेळाडू देखील आपीएलच्या पहिल्या दिवसापासून उपलब्ध राहण्याची शक्यता कमी आहे. दक्षिण आफ्रिका-बांगलादेश सीरिजमुळे निर्माण झालेला पेचप्रसंग दूर करण्यासाठी बीसीसीआय आता क्रिकेट साऊथ आफ्रिकेचे कार्यकारी प्रमुख ग्रॅमी स्मिथ यांच्याशी चर्चा करणार असल्याच वृत्त ‘पीटीआयनं’ दिलं आहे. IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर! ‘आमचे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे हे खेळाडू लवकरात लवकर आयपीएल स्पर्धेत खेळतील याबाबत आम्ही आशावादी आहोत. आफ्रिकन खेळाडू तीन आठवडे आयपीएलपासून दूर राहिले, तर तो ते सहभागी असलेल्या टीमसाठी मोठा धक्का असेल,’ अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. बीसीसीआय तोडगा काढण्यासाठी आशावादी असलं तरी ग्रॅमी स्मिथ यांचा कार्यकाळ 31 मार्च रोजी संपतोय. त्यामुळे ते कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात याबाबतचा काय निर्णय घेणार? याकडं आयपीएल टीम्सचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.