मुंबई, 8 एप्रिल : महाराष्ट्रासह मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची (Covid-19) संख्या झपाट्यानं वाढत आहे. मुंबईत कोरोनाची स्थिती गंभीर होत असूनही आयपीएल स्पर्धेतील सामने (IPL 2021) हे नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलंय. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) शनिवारी मुंबईतील पहिली मॅच होणार आहे. या मॅचला मुंबईकरांनीच विरोध केला आहे. वानखेडे स्टेडियमवरील सामने इतरत्र हलवा अशी मागणी करणार पत्र या स्टेडियमच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहिलं आहे.
याबाबत 'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलेल्या वृत्तानुसार या नागरिकांनी 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. या सामन्यांसाठी आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंना बघण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात स्टेडियमजवळ गर्दी करतील अशी भीती या नागरिकांनी व्यक्त केली आहे. वानखेडे स्टेडियमच्या जवळ रहिवाशी भाग आहे. त्यामुळे इथं होणारे सर्व सामने रहिवाशी भाग नसलेल्या भागात हलवावे अशी मागणी मरीन ड्राईव्ह रेसिडेंट्स असोसिएशनच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.
"राज्य सरकारनं धार्मिक, सामाजिक कार्यक्रम तसंच लग्न आणि मृत्यू सारख्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. या कठीण परिस्थितीमध्ये बरेच दिवस चालणाऱ्या आयपीएल स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांना मात्र परवानगी देण्यात आली आहे." या मुद्याकडं या संघटनेच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. वानखेडे स्टेडियमवर 10 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान 10 सामने होणार आहेत.
"दरवर्षी या सामन्यांच्या दरम्यान या भागात पार्किंगवर निर्बंध घातले जातात. त्याचा त्रास परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागतो. सध्याच्या कोव्हिड परिस्थितीमध्ये हे निर्बंध चुकीचे आहेत," असे मत डी रोड भागात राहणाऱ्या एका रहिवाशाने व्यक्त केले आहे.
(IPL 2021: 'या' राजवाड्यात राहतात मुंबई इंडियन्सचे खेळाडू, पाहा VIDEO)
दरम्यान वानखेडे स्टेडियमवरील 11 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व सदस्य लोकलने मुंबईतील वेगवेगळ्या भागातून स्टेडियममध्ये येतात. हा प्रकार उघड झाल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशननं (MCA) सदस्यांना राहण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
वानखेडे स्टेडियमवरील कर्मचाऱ्यांप्रमाणेच ब्रॉडकास्ट विभागातील 14 जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या सदस्यांचा कोरोना रिपोर्ट 5 एप्रिल रोजी पॉझिटीव्ह आल्याचा माहिती आहे. ब्रॉडकास्ट टीममधील डायरेक्टर, EVS प्रोड्यूसर, प्रोड्यूसर, कॅमेरामन आणि व्हिडीओ एडिटर्सना कोरनोची लागण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Mumbai, Wankhede stadium