मुंबई, 26 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) विजयी घौडदौडीला अखेर चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) लगाम लावला. मुंबईमध्ये रविवारी झालेल्या मॅचमध्ये चेन्नईनं बंगळुरुचा 69 रननं मोठा पराभव केला. हा आरसीबीचा या स्पर्धेतील पहिलाच पराभव आहे. या पराभवानंतर आरसीबीला आणखी एक धक्का बसला आहे. आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) स्लो ओव्हर रेटमुळे (Slow Over rate) दंड बसला आहे.
आयपीएल आचारसंहितेच्या अनुसार विराटवर ही कारवाई केली आहे. विराटची ही पहिलीच चूक असल्यानं त्याला 12 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. या प्रकारचा दंड बसलेला विराट कोहली हा या स्पर्धेतील चौथा कॅप्टन आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni), मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma), कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) यांच्यावरही या नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
नियम काय सांगतो?
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या नियमानुसार प्रत्येक टीमला 90 मिनिटांत 20 ओव्हर पूर्ण करणं अपेक्षित आहे. यापूर्वी 90 व्या मिनिटाला 20 वी ओव्हर सुरू करावी असा नियम होता, परंतु आता निर्धारित दीड तासाच्या आत 20 ओव्हर पूर्ण करावं लागणार आहे. शिवाय या 90 मिनिटांत संघाला अडीच मिनिटांचा दोनदा टाइम आऊटही मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघांला 85 मिनिटांत एकूण 20 ओव्हर टाकणं अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला एका तासामध्ये 14.1 ओव्हर टाकावी लागतील.
IPL 2021 :चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये बँगलोरकडून मोठी चूक, विराट माफ करणार नाही!
आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, पहिल्यांदा नियमांचं उल्लंघन केल्यास 12 लाख रुपयांचा दंड आणि पुढील दोन सामन्यांमध्ये पुन्हा तीच चूक केली तर कर्णधाराला कडक शिक्षेचा सामना करावा लागू शकतो. पहिल्यांदा ही चूक झाली तर कॅप्टनला 12 लाखांचा दंड, दुसऱ्यांदा चूक झाली तर कॅप्टनला 24 लाखांचा दंड तिसऱ्या चुकीसाठी कॅप्टनवर एका मॅचची बंदी असा नियम आहे. तर दुसऱ्यांदा या चुकीनंतर टीममधील खेळाडूंना 6 लाख रुपये किंवा मॅच फिसमधील 25 टक्के रक्कम (यापैकी जे कमी असेल ते) दंड, तिसऱ्या चुकीनंतर टीममधील खेळाडूंना 12 लाख रुपये किंवा मॅच फिसमधील 50 टक्के रक्कम (यापैकी जी रक्कम कमी असेल ती) दंड म्हणून द्यावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Csk, IPL 2021, RCB, Virat kohli