मुंबई, 6 ऑक्टोबर : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेत मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) मंगळवारी त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ केला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीमनं राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 8 विकेट्सनं दणदणीत पराभव केला. राजस्थानला 90 रनमध्ये रोखल्यानंतर मुंबईनं हे लक्ष्य फक्त 50 बॉलमध्ये पूर्ण केलं. या विजयामुळे मुंबईच्या रनरेटही सुधारला आहे.
मुंबईच्या या विजयात इशान किशनचं (Ishan Kishan) महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यानं फक्त 25 बॉलमध्ये नाबाद 50 रन केले. इशाननं या खेळीत 5 फोर आणि 3 सिक्स लगावले. इशानची या आयपीएलमध्ये कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यामुळे त्याला काही मॅचमध्ये वगळण्यात आले होते. राजस्थान विरुद्धच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला. तसंच त्याला ओपनिंगला उतरवण्यात आले. रोहित शर्माची ही चाल अचूक ठरली आहे.
इशान किशनची टी20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियातही निवड झाली आहे. त्यामुळे तो फॉर्ममध्ये येणं ही टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला हा मोठा विजय मिळवून दिल्यानंतर इशान किशननं या अडचणीच्या प्रसंगी रोहित शर्माची मदत मिळाल्याचं सांगितलं. त्याचबरोबर त्याला फॉर्ममध्ये परत येण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माशी केलेल्या चर्चेचा फायदा झाल्याचं मान्य केलं.
IPL 2021: विराटच्या डोक्यात फक्त T20 World Cup चा विचार, मॅचनंतर जिंकली सर्वांची मनं
इशाननं मॅचनंतर सांगितलं की, 'चढ-उतार हा खेळाचा भाग आहे. मी खराब अवस्थेतून जात होतो. त्यावेळी विराच कोहली आणि रोहित शर्माशी माझ्या बॅटींगबाबत बातचित केली. त्यानंतर मी माझे जुने व्हिडीओ पाहिले. त्याचा मला मोठा फायदा झाला. पोलार्डच्या सूचनेनंतर मी जुने व्हिडीओ पाहिले.'
राजस्थान रॉयल्सविरुद्ध अनुभवी क्विंटन डी कॉकच्या जागी इशान किशनला रोहित शर्मानं संधी दिली. इशाननं त्याच्या खेळाची सुरुवात संथ केली. चेतन सकारियाविरुद्ध त्यानं संपूर्ण ओव्हर मेडन खेळून काढली. पण त्यानंतर त्यानं फटकेबाजी सुरु केली. चेतन सकारियाच्या पुढच्या ओव्हरमध्ये त्यानं 2 सिक्स आणि 1 फोर लगावला. मुस्तफिजूर रहमानच्या 9 व्या ओव्हरमध्ये सिक्स लगावत त्यानं अर्धशतक पूर्ण केले आणि मुंबई इंडियन्सला मोठा विजय मिळवून दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Ishan kishan, T20 world cup