मुंबई, 3 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) सुरु होण्यासाठी आता काही दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील (Wankhede Stadium, Mumbai) आठ कर्मचाऱ्यांना (groundsmen) कोरोनाची लागण झाली आहे. वानखेडे स्टेडियमवर 10 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान आयपीएलच्या 10 मॅच होणार आहेत. ‘स्पोर्ट्सस्टार’ ने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, वानखेडे स्टेडियमवरील सर्व 19 कर्मचाऱ्याची RT-PCR टेस्ट मागच्या आठवड्यात घेण्यात आली होती. यापैकी 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं 26 मार्च रोजी उघड झालं. तर अन्य 5 जणांचा 1 एप्रिल रोजी कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. 10 तारखेला होणार पहिली मॅच कोरोना पॉझिटीव्ह झालेल्या कर्मचाऱ्यांना अन्य कर्मचाऱ्यांपेक्षा वेगळं ठेवलं आहे का? याबाबत कोणतीही माहिती अजून समजलेली नाही. वानखेडे स्टेडियमवर 10 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) ही पहिली मॅच होणार आहे. या मॅचची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना हा कोरोना स्फोट झाल्यानं बीसीसीआयच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता पर्याय काय? मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) या अडचणीच्या परिस्थितीमध्ये वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समधील शरद पवार अकादमी आणि कांदिवलीमधील सचिन तेंडुलकर जिमखानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वानखेडे स्टेडियमवर नियुक्ती करण्याची शक्यता आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्यानं मुंबईतील सामन्यांबाबत बीसीसीआय काही टोकाचा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ( वाचा : On This Day : 6,6,6,6 ब्रेथवेटच्या सलग चार सिक्स नंतर रडला होता बेन स्टोक्स! ) कोरोना व्हायरस रुग्णांची सर्वात जास्त संख्या ही महाराष्ट्रात आहे. यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या सर्व निर्बंधानंतरही बीसीसीआयनं आयपीएलच्या 10 सामन्यांचं आयोजन मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.