नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : आयपीएलमधील तीन वेळा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्सने रविवारी आयपीएल-2021 च्या अतिशय रोमांचक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (CSK vs KKR) शेवटच्या चेंडूवर 2 गडी राखून पराभव केला. कोलकाताच्या संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 171 धावा केल्या आणि चेन्नईला विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी 8 विकेट गमावून साध्य केले. या विजयासह चेन्नई सुपर किंग्ज संघाने पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. त्यांचे 10 सामन्यात 16 गुण आहेत. तर केकेआरला 10 सामन्यांमध्ये सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आणि ते 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर कायम आहेत.
चेन्नईला शेवटच्या दोन षटकांत विजयासाठी 26 धावांची गरज होती. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या 19 व्या षटकात रवींद्र जडेजाने अप्रतिम कामगिरी दाखवली. त्याने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग षटकार मारले आणि शेवटच्या दोन चेंडूंवर चौकार लगावले. या षटकात एकूण 22 धावा झाल्या आणि चेन्नईच्या विजयाचा मार्गही पक्का झाला. डावाच्या शेवटच्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर जडेजा सुनील नरेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 8 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार मारले आणि 22 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. दीपक चहरने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली आणि चेन्नईच्या चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली.
हे वाचा - MI vs RCB : मुंबई इंडियन्सचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; हार्दीक पंड्या परतला
172 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिसने चेन्नईला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी काही उत्कृष्ट फटके मारले आणि टीमने पॉवरप्लेमध्ये 52 धावा केल्या. ही भागीदारी आंद्रे रसेलने तोडली. ऋतुराज डावाच्या 9 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मॉर्गनच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्याने 28 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार मारले. फाफ डु प्लेसिसचे अर्धशतक हुकले (43 धावा) आणि प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर तो बाद झाला, त्याने 30 चेंडूत 7 चौकार मारले.
WHAT. A. MATCH! 👌 👌 Absolute scenes in Abu Dhabi as @ChennaiIPL win the last-ball thriller against the spirited @KKRiders. 👏 👏#VIVOIPL #CSKvKKR Scorecard 👉 https://t.co/l5Nq3WwQt1 pic.twitter.com/Q53ym5uxtI
— IndianPremierLeague (@IPL) September 26, 2021
संघाच्या 102 धावा झाल्या असताना डु प्लेसिस पॅव्हेलियनमध्ये परतला. अंबाती रायुडू काही विशेष कामगिरी करू शकला नाही, 10 धावांवर तो सुनील नरेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 9 चेंडू खेळले आणि 1 चौकार मारला. रायुडू आणि मोईन अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी 17 धावा जोडल्या. मोईन अलीचा जम बसल्याचे वाटत होते आणि तो विजय मिळवून परत येईल असे वाटत होते, पण फर्ग्युसनच्या डावाच्या 17 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याला व्यंकटेश अय्यरने झेलबाद केले. त्याने 28 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 32 धावा केल्या.
चेन्नईला शेवटच्या 3 षटकांत 18 धावांची गरज होती. पण वरूण चक्रवर्तीच्या षटकात 2 विकेट पडल्या. रैना पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला. त्यानंतर वरुणने तिसऱ्या चेंडूवर कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बोल्ड केले. त्याला फक्त 1 धाव करता आली.
हे वाचा - गुडघ्यातून वाहत होतं रक्त तरीही सोडला नाही; CSK च्या प्लेअरचा सीमारेषेवर अफलातून झेल
तत्पूर्वी, कोलकात्याने निर्धारित 20 षटकांत 6 गडी बाद 171 धावा केल्या. राहुल त्रिपाठीने केकेआरसाठी सर्वाधिक 45 धावा केल्या. त्याच्याशिवाय नितीश राणाने नाबाद 37 आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने 26 धावांचे योगदान दिले. नितीश आणि कार्तिकने सहाव्या विकेटसाठी 41 धावा जोडल्या. चेन्नईकडून वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि जोश हेझलवूडने 2-2 विकेट घेतल्या तर रवींद्र जडेजाला 1 विकेट मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.