मुंबई, 8 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा सिझन (IPL 2021) शुक्रवारी सुरु होत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू, स्टाफ, ब्रॉडकास्टर्स आणि स्पर्धेशी निगडीत मंडळींना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या (BCCI) डोकेदुखीत भर पडली आहे. स्पर्धा संपेपर्यंत आयपीएलशी संबंधित सर्व मंडळी बायो-बबलमध्ये राहणार आहेत. त्याचबरोबर यंदा स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय ही स्पर्धा होणार आहे. असं असलं तरी, ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी कोरोना (Corona) हा एक प्रबळ प्रतिस्पर्धी म्हणून समोर आला आहे.
कोरोना व्हायरसच्या (Covid-19) वाढत्या संख्येमुळे बीसीसीआयनं सरकारकडं खास मागणी केली आहे. यामध्ये विमान तळावर वेगळा चेक-इन काऊंटर तयार करण्याची मागणी केली आहे. मागच्या वर्षी युएईमध्ये फक्त तीन शहरांमध्येच स्पर्धा झाली होती. त्यावेळी सर्व खेळाडू बसनं प्रवास करत होते.
यंदा आयपीएल स्पर्धा मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, बंगळुरु आणि चेन्नई या सहा शहरांमध्ये होणार आहेत. एका ठिकाणीवरुन दुसरिकडं जाण्यासाठी विमान प्रवास आवश्यक आहे. विमानतळावर खेळाडू आणि आयपीएलशी संबंधित अन्य मंडळी व्हायरसच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे.
मुंबई आणि दिल्ली शहरांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अर्थात मुंबईमध्ये आयपीएलला सामन्यांना सूट देण्यात आली आहे. मुंबई, दिल्लीसह अन्य चार शहरंही कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहेत.
बीसीसीआयनं बायो-बबल अधिक सुरक्षित करण्यासाठी कोव्हिड टेस्ट अधिक करण्यावर जोर दिला आहे. चेन्नईमध्ये विमानात बसण्यापूर्वी केलेल्या टेस्टमध्ये एका सदस्याचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. त्यानंतर पाच दिवसांनी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रवासाच्या दरम्यान कोरोनाचा धोका अधिक असल्याचं मानलं जात आहे. प्रत्येक टीम बायो-बबलमध्ये प्रवेश केल्यानंतर तीन वेळा विमान प्रवास करणार आहे. त्यामुळे बीसीसीआयनं वेगळ्या 'चेक इन काऊंटर' ची मागणी केली आहे.
( वानखेडेवरील सामने इतरत्र हलवा, Corona संकटकाळात मुंबईकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र )
याशिवाय वेगळ्या बायो-बबल इंटिग्रिटी मॅनेजरची नियुक्ती करण्याचा विचारही बीसीसीआय करत आहे. आयपीएलशी संबंधित कोणताही सदस्य मास्क न घालता रुमच्या बाहेर पडणार नाही. तसंच खेळाडूंनी हॉटेलमधील कॉमन एरियामध्ये तसेच मैदानातून बाहेर पडताना मास्क घातला असेल याची खबरदारी हा मॅनेजर घेणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airplane, BCCI, Biobubble, Corona, Covid-19, Cricket news, IPL 2021, Sports, Travel