चेन्नई, 19 एप्रिल: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या टीमचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या एबी डीव्हिलियर्सची (Ab De Villiers) या आयपीएलमधील कामगिरी जोरदार होत आहे. त्यानं बंगळुरुच्या तीन पैकी दोन विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. रविवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये डीव्हिलियर्सनं फक्त 34 बॉलमध्ये नाबाद 76 रन काढले. या खेळीनंतर भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपबाबत डीव्हिलियर्सनं एक मोठं वक्तव्य केलं आहे.
डीव्हिलियर्स तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला होता. त्यानंतर त्याच्या पुनरागमनाची चर्चा सतत सुरु आहे. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2020) रद्द झाला आणि ही चर्चा काही काळ बंद झाली होती. आता पुन्हा एकदा या विषयावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
केकेआर विरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर डीव्हिलियर्सनं या विषयावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. "माझा दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये समावेश झाला तर ते चांगलं असेल. पण मी पुनरागमन करण्यात अपयशी ठरलो तरी मला कोणतीही खंत वाटणार नाही. मला यामध्ये रस आहे. माझा फॉर्म आणि फिटनेसबद्दल बोलायचं तर आम्हाला सर्वश्रेष्ठ 15 खेळाडूंची निवड करायला हवी. आम्ही त्यानुसार योजना तयार करु. आयपीएल स्पर्धेच्या शेवटी मी या विषयावर बाऊचरशी चर्चा करणार आहे." असं डीव्हिलियर्सनं स्पष्ट केलं.
मार्क बाऊचरनं दिले होते संकेत
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर (Mark Boucher) याने डीव्हिलियर्सच्या पुनरागमनाबाबतचे संकेत दिले आहेत."मी त्याला (डीव्हिलियर्स) खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर त्याच्याशी या विषयावर चर्चा करणार आहे." असं बाऊचरनं सांगितलं होतं.
IPL 2021 : RCB च्या विजयासोबतच मुंबई इंडियन्सना धक्का
डीव्हिलियर्सनं दक्षिण आफ्रिकेसाठी 114 टेस्टमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीनं 8765 रन केले आहेत. यामध्ये 22 शतक आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे. डीव्हिलियर्सनं 228 वन-डेमध्ये 53 पेक्षा जास्त सरासरीनं 22 शतक आणि 53 अर्धशतकांच्या मदतीनं 8765 रन केले आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 1762 रन काढले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Cricket, IPL 2021, South africa, Sports, T20 world cup