कोलंबो, 29 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील मालिकेत श्रीलंकेच्या तरुण टीमनं चांगली कामगिरी केली आहे. क्रिकेट बोर्डाशी वाद, इंग्लंड दौऱ्यात 3 खेळाडूंवर झालेली शिस्तभंगाची कारवाई, प्रमुख खेळाडूंना दुखापत यामुळे या मालिकेत श्रीलंका टीमकडून फारशी अपेक्षा नव्हती. यजमान टीमनं वन-डे मालिका गमावल्यानंतर जिद्दीनं खेळ करत टीम इंडियाला चांगली लढत दिली. या मालिकेत श्रीलंकेच्या काही खेळाडूंनी क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
श्रीलंकेचा लेग स्पिनर वानिंदू हसरंगाला ( Wanindu Hasaranga) 4 आयपीएल टीमनं संपर्क साधला आहे. 'न्यूज वायर' या श्रीलंकेच्या वेबसाईटनं हे वृत्त दिलं आहे. आयपीएल स्पर्धा कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. या स्पर्धेतील उर्वरित 29 सामने युएईमध्ये होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं वेळापत्रक आणि आयपीएल नंतर होणारा टी20 वर्ल्ड कप याचा विचार करत अनेक विदेशी खेळाडूंनी उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली आहे. इंग्लंडचे खेळाडू या आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचं त्यांच्या क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केलंय. तसंच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा देखील या स्पर्धेतील सहभाग अनिश्चित आहे. त्या पार्श्वभूमीवर हसरंगाला बदली खेळाडू म्हणून 4 आयपीएल टीमनं संपर्क केला आहे.
IND vs SL : टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी, मालिका गमावण्याचं गंभीर संकट!
हसरंगानं भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेत जोरदार कामगिरी केली आहे. त्यानं 3 टी20 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 5.58 इतका कमी आहे. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात तर हसरंगानं कमाल केली. त्यानं या सामन्यात 4 ओव्हर्समध्ये फक्त 9 रन देत संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड , भुवनेश्वर कुमार आणि वरुण चक्रवर्ती या चौघांना आऊट केले. या मालिकेतील चांगल्या कामगिरीमुळे त्यानं आयसीसी टी20 रँकिंगमध्येही दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India Vs Sri lanka