मुंबई, 15 मे : कोरोना व्हायरसच्या (coronavirus) उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) अचानक स्थगित करावा लागला. आता या स्पर्धेतील उर्वरित 31 सामने कधी घ्यायचे ही बीसीसीआयसमोरची (BCCI) मोठी डोकेदुखी आहे. त्यातच टीम इंडियाच्या (Team India) श्रीलंका दौऱ्यावर देखील कोरोनाचे काळे ढग जमा झाले आहेत. टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात 3 वन-डे आणि तितक्याच टी20 होणार आहेत.
श्रीलंकेत कोरोनाचे गेल्या आठवडाभरात 16 हजारांहून जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 145 जणांचा मृत्यू झालाय. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) सीरिज दुसऱ्यांदा स्थगित करण्याची वेळ येऊ शकते. ही सीरिज जून 2020 मध्ये नियोजित होती. त्यावेळी देखील कोरोनामुळे सीरिज स्थगित करावी लागली होती.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं 'इनसाईड स्पोर्ट्स'शी बोलताना देशातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्याचवेळी, 'आम्ही कोरोना काळात यापूर्वी इंग्लंड आणि अन्य मालिकेचं यशस्वी आयोजन केलं आहे. भारताच्या दौऱ्याचं आयोजन करण्यातही आम्ही सक्षम आहोत.' असा विश्वास त्यानं व्यक्त केला आहे.
कोरोनाशी लढणाऱ्या भारताबद्दल मॅथ्यू हेडनची भावुक प्रतिक्रिया, वाचून वाटेल अभिमान!
भारतीय टीम इंग्लंडमध्ये असतानाच जुलै महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे आणि टी-20 सीरिज होणार आहे. या सीरिजसाठी पूर्णपणे वेगळ्या टीमची निवड केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिखर धवनला (Shikhar Dhawan) श्रीलंका दौऱ्यासाठी टीमचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं. धवन टीम इंडियाचा वरिष्ठ खेळाडू आहे, तसंच नुकत्याच स्थगित झालेल्या आयपीएलमध्येही (IPL 2021) धवनने उत्कृष्ट कामगिरी केली होती. शिखर धवनशिवाय श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) हेदेखील कर्णधारपदाच्या रेसमध्ये आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.