अहमदाबाद, 24 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड
(IND vs ENG) यांच्यात अहमदाबादमध्ये होणारी तिसरी टेस्ट भारताचा फास्ट बॉलर इशांत शर्मासाठी
(Ishant Sharma) खास आहे. बांगलादेशविरुद्ध 2007 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या इशांतची ही 100 वी टेस्ट आहे. या टेस्टच्या निमित्ताने इशांतची बायको
(Pratima Singh) परिवारासह अहमदाबादमध्ये दाखल झाली आहे. इशांतच्या यशाचं रहस्य तिने यावेळी सांगितलं. त्याचबरोबर इशांत एकदा आपल्याशी फोनवर बोलताना ओक्साबोक्शी रडल्याची हळवी आठवण देखील तिने सांगितली आहे.
‘लेडी लक नाही’
इशांतची बायको प्रतिमा सिंह ही बास्केटबॉलपटू आहे. या दोघांनी डिसेंबर 2016 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर इशांतच्या खेळात चांगलीच सुधारणा झाली आहे. आयपीएलमध्ये
(IPL) देखील इशांतनं पुनरागमन केलं आहे.
इशांतच्या या यशामागे ‘लेडी लक’
(Lady Luck) आहे असं समजण्यास प्रतिमा तयार नाही. ‘हे लेडी लक नाही तर हार्ड वर्कचं
(Hard Work) यश आहे. कोणत्याही गोष्टींचं श्रेय मुलींना देऊ नये. इशांतने आयुष्यभर सातत्याने जे कठीण परिश्रम केले आहेत. त्याचं हे यश आहे,’ असं प्रतिमाने सांगितलं.
‘मला क्रिकेटबद्दल फार माहिती नाही. पण एका फास्ट बॉलरने 100 टेस्ट खेळणं ही मोठी गोष्ट असल्याचं सर्व सांगतात. तुमच्यात शिस्त नसेल तर शरीर योग्य पद्धतीनं काम करणार नाही. मी त्याला 2011 पासून ओळखते. गेल्या 10 वर्षात थकवा, प्रवास किंवा अन्य कोणत्याही वैयक्तिक अथवा प्रोफेशनल कारणांमुळे त्याने ट्रेनिंग चुकवल्याचं मी कधीच पाहिलं नाही,’ असं प्रतिमाने यावेळी स्पष्ट केलं.
इशांतची भावुक आठवण!
शांत स्वभावाच्या इशांत शर्माची एक भावुक आठवण देखील प्रतिमाने यावेळी सांगितली. ‘इशांत साधरणपणे शांत असतो आणि कुणाशी फार बोलत नाही. मात्र आमचं डेटिंग सुरू होतं त्या काळात म्हणजेच 2013 साली इशांत एकदा फोनवर बोलताना खूप रडला होता. मोहालीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये जेम्स फॉकनरने इशांतच्या एका ओव्हरमध्ये 30 रन काढले होते. त्या मॅचनंतर फोनवर बोलताना इशांत ओक्साबोक्शी रडला होता, अशी आठवण प्रतिमाने सांगितली.
‘त्यावेळी मी त्याला क्रिकेट ही मोठी गोष्ट असली तरी तो एक खेळ आहे. जेव्हा तू असा विचार करशील त्यावेळी खेळात या गोष्टी घडतात हे समजेल आणि तू यामधून बाहेर पडशील,’ असा सल्ला इशांतला दिला होता अशी आठवणही प्रतिमानं शेअर केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.