लीड्स, 25 ऑगस्ट: भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील टेस्ट सीरिज खेळाडूंमधील वादामुळे गाजत आहे. लॉर्ड्समध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांशी मैदानावर भिडले होते. मैदानातील या वादाचे पडसाद मैदानाबाहेरही उमटले. इतकंच नाही तर हा वाद दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये झाला होता, असा धक्कादायक खुलासा तिसरी टेस्ट सुरु होण्यास काही वेळ शिल्लक असताना झाला आहे.
'टेलिग्राफ' ने दिलेल्या वृत्तानुसार लॉर्ड्स टेस्टच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली (Virat Kohli) आणि इंग्लंडचा कॅप्टन जो रूट (Joe Root) यांच्यात वाद झाला होता. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) जेम्स अँडरसनला (James Anderson) बाऊन्सर टाकले होते. या प्रकरणाचे पडसाद त्यानंतर लॉर्ड्सच्या लाँग रुममध्ये उमटले. तिथं विराट कोहली आणि जो रूट यांच्यात वाद झाला.
याच कारणामुळे विराट उरलेल्या दोन दिवसात मैदानात प्रचंड आक्रमक होता. इंग्लंडच्या टीमनं आपल्याला चिथावणी दिल्याचा दावा विराटनं केला होता, पण त्याचं कारण स्पष्ट नव्हतं. विराटनं या विषयावर प्रतिक्रिया देताना म्हंटलं होतं की, 'हा विजय मोठं समाधान देणारा आहे. एक टीम म्हणून आम्ही कुणासमोरही झुकत नाही किंवा माघार घेत नाही. आम्ही एकत्र खेळतो आणि एकत्र जिंकतो. प्रतिस्पर्धी टीमला कधीही हलकं लेखत नाही.' विराटनं यामध्ये दोघांमधील स्लेजिंगचा काहीही उल्लेख केला नव्हता.
अँडरसननं सांगितला अनुभव
जेम्स अँडरसननं एका पॉडकास्टला बोलताना बुमराहच्या तिखट स्पेलचा अनुभव सांगितला आहे. ''मी बॅटींग करण्यासाठी आलो होतो त्यावेळी बुमराहनं मला शॉर्ट बाऊन्सर आणि यॉर्कर लाईन बॉलिंग केली. मला त्यावेळी असं वाटलं की तो मला आऊट करण्याचा प्रयत्न करत नाही. मी विकेटवर उभा होतो आणि जो रुटला स्ट्राईक देण्याचा माझा प्रयत्न होता. बुमराहनं दोन बॉल यॉर्करही टाकले होते. मी ते कसेबसे वाचवले.
IND vs ENG: जो रूट ठरतोय टीम इंडियाची सर्वात मोठी डोकेदुखी, लीड्समध्ये करणार नवा रेकॉर्ड
मी बॅटींगला आलो तेव्हा पिच स्लो होते. बुमराह त्याच्या क्षमतेप्रमाणे फास्ट बॉलिंग करत नाहीय, असं जो रूटनं मला सांगितलं होतं. मी त्याचा पहिला बॉल खेळला त्याचा वेग 90 मैल प्रति तास होता. तो पाहून मी थक्क झालो. मला माझ्या कारकिर्दीमध्ये यापूर्वी असं कधीही वाटलं नव्हतं,' अशी कबुली अँडरसननं दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Joe root, Virat kohli