चेन्नई, 16 फेब्रुवारी : स्पिन बॉलिंगला मदत करणाऱ्या चेन्नईच्या पिचवर आर. अश्विननं (R. Ashwin) जादू दाखवायला सुरुवात केली आहे. अश्विननं चौथ्या दिवशी सकाळी दोन झटपट विकेट घेतल्या. त्यानंतर अक्षर पटेलनं एक विकेट घेतली. त्यामुळे इंग्लंडची टीम मोठ्या संकटात सापडली आहे. अश्विननं या मालिकेत सलग तिसऱ्यांदा बेन स्टोक्सला (Ben Stokes) आऊट केलं. चौथ्या दिवशी सकाळी इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं (Joe Root) डॅन लॉरेन्ससोबत खेळण्यास सुरुवात केली. लॉरेन्स फार काळ टीकू शकला नाही. अश्विननं त्याला आऊट केलं. ऋषभ पंतनं अत्यंत चपळाईनं विकेट किपिंग करत लॉरेन्सला स्टंप आऊट केलं.
लॉरेन्स आऊट झाल्यानंतर जो रुट आणि बेन स्टोक्स या सर्वात अनुभवी जोडीवर इंग्लंडची भिस्त होती. स्टोकसं त्याच्या आक्रमक खेळाला मुरड घालत संयमी खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा प्रयत्न फार काळ यशस्वी झाला नाही. अश्विननं त्याला विराट कोहलीकडे कॅच देण्यास भाग पाडले. स्टोक्स फक्त 8 रन काढून आऊट झाला.
R Ashwin strikes again!
— ICC (@ICC) February 16, 2021
Ben Stokes is dismissed for 8 and England are five down.#INDvENG | https://t.co/DSmqrU68EB pic.twitter.com/lIcvou8ytT
अश्विननं टेस्टमध्ये स्टोक्सला आऊट करण्याची ही दहावी वेळ आहे. तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं स्टोक्सला एकूण 14 वेळा आऊट केलं आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वात दबदबा असणारा बेन स्टोक्स अश्विनच्या जाळ्यात पुन्हा पुन्हा फसतो हेच या आकडेवारीहून स्पष्ट होते.
(वाचा - IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का, महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत! )
जो रुट बचावला! इंग्लंडचा कॅप्टन जो रुटला तिसऱ्या दिवशी थर्ड अंपायरच्या निर्णयाचा फायदा मिळाला. तिसऱ्या दिवशी अक्षर पटेलनं टाकलेल्या बॉलवर जो रुट कॅच आऊट असल्याचं अपिल भारतीय खेळाडूंनी केलं. अंपायरनं नॉट आऊट असल्याचा निर्णय घेतल्यावर विराट कोहलीनं DRS घेण्याचा निर्णय घेतला. जो रुटच्या बॅटचा बॉलला स्पर्श झाला नसल्याचं तिसऱ्या अंपायरला रिप्लेमध्ये आढळलं. त्याच रिप्लेमध्ये रुट LBW आऊट असल्याचे दिसत होते. तिसऱ्या अंपायरने LBW कडं दुर्लक्ष केलं आणि मैदानातल्या अंपायरचा निर्णय कायम ठेवत रुट ‘नॉट आऊट’ असल्याचं जाहीर केलं. भारताचा कॅप्टन विराट कोहली या निर्णयावर चांगलाच नाराज झाला होता.