मेलबर्न, 12 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या तिरंगी टी20 मालिकेच्या अंतिम फेरीत भारताला पराभव पत्करावा लागला. मेलबर्नमध्ये झालेल्या या सामन्यात भारताला 156 धावांचे आव्हान मिळाले होते. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताला 144 धावांपर्यंत मजल मारता आली. स्मृती मानधनाचे अर्धशतक व्यर्थ गेलं.
दरम्यान, सामन्यावेळी भारताच्या हातून स्टम्प माइकमुळे एक विकेट निसटली. ऑस्ट्रेलियाच्या मेग लेनिंग आणि बेथ मुनी या दोघी खेळत होत्या. त्यावेळी अरुंधती रेड्डीच्या गोलंदाजीवर लेनिंगने एक धाव घेतली. तेव्हा शिखा पांडेने लेनिंगला धावबाद करण्यासाठी थ्रो केला. मात्र स्टम्प माइकच्या वायरला चेंडू लागल्याने वळला. त्यामुळे लेनिंग धावबाद होण्यापासून वाचली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 11 धावांनी पराभव केला. भारताकडून स्मृती मांधनाने सर्वात जास्त 66 धावा केल्या. मात्र मांधनाला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला चांगली सुरुवात करता आली नाही.
Another example of technology saving the batter!
Have you ever seen this before? #AUSvIND pic.twitter.com/oQkGOuTyWO
— cricket.com.au (@cricketcomau) February 12, 2020
भारताची सलामीची फलंदाज शेफाली वर्मा 10 धावांत बाद झाली. त्यानंतर स्मृती मांधनाने एकहाती भारताचा डाव सांभाळला. स्मृतीने 12 चौकारांच्या मदतीने 178.37च्या स्ट्राईक रेटने 66 धावा केल्या. यासह या मालिकेत 216 धावांसह मांधनाने सर्वात जास्त धावा केल्या. तर, राजश्री गायकवाडने या मालिकेत सर्वात जास्त 10 विकेट घेतल्या.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 155 धावा करता आल्या. भारताकडून दिप्ती शर्माने 30 धावा देत 2 तर राजश्री गायकवाडने 32 धावा देत 2 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने सर्वात जास्त 71 धावा केल्या.
या मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रदर्शन चांगले राहिले होते. पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला. मात्र, यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध सलग 2 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. टी -20 तिरंगी मालिकेच्या त्यांच्या तिसर्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 7 गडी राखून पराभूत केले, ज्यामुळे संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. मात्र अंतिम सामन्यात भारताला विजय मिळवता आला नाही.
बुमराहची करिअरमधली सर्वात वाईट कामगिरी! वर्षभरानंतर गमावले सिंहासन